राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. कारण हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधिमंडळात पोहोचले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी बेड्या का घातल्या असा प्रश्न अनेकांना पडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत म्हटलं की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांचे आवाज बंद केले जात आहेत. ही पद्धत चुकीचा आहे. व्यक्त होणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे. आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे. राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच हे आमचे मूलभूत अधिकार आहेत. ते शाबूत राहिलेच पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत."
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Murder Case: आरोपपत्रातील 'ती' ओळ वगळावी; अंजली दमानियांनी का केली मागणी?)
"अमेरिकेत भारतीयांवर अन्याय होत आहे. व्हीसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेले धोरण अनेक भारतीयांचा संसार उद्ध्वस्त करणारं आहे. भारतीयांना विमानात कोंबून भारतात पाठवलं गेलं. पायात साखळदंड, हातात हतकड्या, शौचालयाला जागा नाही, जेवण नाही असं अपमानित करून भारतीयांना भारतात पाठवलं गेलं", असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
अमेरिका आपला बाप नाही
"अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसाठी स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. या बेड्यांविरोधात भारतीय म्हणून आपण बोलणार नसू, अमेरिकेच्या अन्यायाविरुद्ध आपण बोलणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. म्हणून प्रातिनिधिक स्वरुपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगत आहेत, हे या बेड्यांपेक्षा कमी नाही. म्हणून या बेड्या माझ्या हातात आहेत. अमेरिकेविरोधात आवाज उठवायला शिका. अमेरिका आपला बाप नाही", असं जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला उद्देशून म्हटलं.
(नक्की वाचा- महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा? या 3 नेत्यांची नावे चर्चेत)
विरोधक आक्रमक
विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधक धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. "महाराष्ट्रात दोन गुंडे, कोकाटे आणि मुंडे", अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.