अमजद खान, कल्याण
Kalyan News: कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी आरोपी गोकूळ झा आणि त्याचा भाऊ रंजित झा या दोघांना कल्याण न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र गोकूळ झा याला किती माज आहे, याचा एक प्रत्यय आज देखील आला. मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीचे शूटिंग करायला गेलेल्या पत्रकारांना गोकूळ झा याने आरेरावी केली. पोलीसांनीही आरेरावी केली. मानपाडा पोलिसांवर पीडितेचे वकील हरीश नायर यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
गोकूळ झा हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात हजर करण्यापूर्वी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मानपाडा पोलीस ठाण्यात होते. त्या दरम्यान गोकूळ झा याने पत्रकारांसह पोलिसांसोबत आरेरावी केली. तुम्ही जे करताय ते चूकीचे करताय. या शब्दात पत्रकारांना गोकूळ झा बोलला. गोकूळ आणि त्याच्या भावाला न्यायालयात हजर केले गेले. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत, पुढील तपासाकरिता पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती केली.
(नक्की वाचा- Kalyan: खासगी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला परप्रांतीय तरुणाकडून हॉस्पिटलमध्येच बेदम मारहाण)
न्यायालयाने दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांपैकी रंजित झा याच्या जामीनाकरिता त्याच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. मात्र पीडितेचे वकील हरीष नायर यांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमीकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या प्रकारे पोलिसांनी बाजू मांडायला हवी होती, तशी मांडली नाही.
(नक्की वाचा- Jalgaon Crime: मित्राची मुलीवर वाईट नजर, आईचीही साथ! डोळ्यादेखत नको ते केलं, जळगावमधील घटना)
पीडितेला गोकूळ झा याच्याकडून धोका आहे. एका दुसऱ्या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी आरोपी गोकूळ झा याचा ताबा मागितला आहे. मानपाडा पोलिसांकडून करण्यात आलेल्या या अर्जावर न्यायालयात सूनावणी होणार आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? असा सवाल देखील पीडितेचे वकिल हरीष नायर यांनी उपस्थित केला आहे. जुन्या प्रकरणात गोकूळ झा याला न्यायालयाकडून पोलीस कोठडी दिली जाते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र गोकूळ झा याचा माज काही उतरताना दिसत नाही.