Kalyan News: कल्याणमधील एका विकासकामाच्या निमित्ताने सुरू झालेली प्रशासकीय कारवाई आता थेट दिल्लीच्या राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराच्या महत्त्वाच्या भागातील अतिक्रमणे हटवताना झालेला एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक वातावरण तापले आहे. प्रशासनाने आपले स्पष्टीकरण दिले असले तरी, आता या वादात राजकीय पक्षांनी उडी घेतल्याने हे प्रकरण केवळ एका उड्डाणपुलाच्या कामापुरते मर्यादित राहिलेले नाही.
काय आहे नेमका वाद?
कल्याणमध्ये प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान प्रस्तावित असलेल्या 4 पदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरातील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर ही कारवाई करण्यात आली.
यावेळी काही बुद्धमूर्ती आणि इतर साहित्य हटवताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये बौद्ध भिक्षू विरोध करताना दिसत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये पुलाच्या कामासाठी खरंच बुद्धमूर्ती हटवल्या का? वाचा प्रशासनाने काय केला खुलासा )
प्रशासनाचा खुलासा काय?
केडीएमसी प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पालिकेच्या आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ही संपूर्ण कारवाई नियमानुसारच पार पडली आहे. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झालेला नाही आणि कारवाईपूर्वी बुद्धभूमी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला होता. भविष्यातही त्यांच्याशी चर्चा सुरू राहील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, फाउंडेशनकडून घेतली जाणारी पत्रकार परिषद तूर्तास स्थगित करण्यात आली असून 5 जून रोजी या संदर्भात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: 'नीट'मध्ये कोऱ्या उत्तरपत्रिकेचा खेळ? उत्तरं भरण्यासाठी 20 लाखांचा रेट, वाचा कसं चालतं रॅकेट )
राहुल गांधींची एन्ट्री होणार?
या प्रकरणात आता काँग्रेसने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसच्या केडीएमसी गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी आयुक्तांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. विकासकामांसाठी कारवाई करण्याला विरोध नाही, मात्र धार्मिक भावना जपणे आणि खबरदारी घेणे आवश्यक होते, असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, येत्या 6 जून रोजी दिल्लीत काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून, त्यामध्ये राहुल गांधी यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती कांचन कुलकर्णी यांनी दिली आहे.
जागेच्या मालकीबाबत खळबळजनक दावा
या वादात सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केलेल्या एका खुलाशामुळे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. बुद्धभूमी फाउंडेशनची जागा ही अनधिकृतपणे केडीएमसीच्या नावावर करण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
मूळ जागा मालकाने ती जागा विकलेली नसतानाही, एका विकासकाने ती जागा विकल्याचे दाखवून त्यावर टीडीआर (TDR) लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे पालिकेच्या भूमापन आणि नगररचना विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या प्रकरणाला आता मोठे राजकीय आणि सामाजिक स्वरूप प्राप्त झाले आहे.