कल्याणच्या मुरबाड रोडवर मंगळवारी सायंकाळी थरार पाहायला मिळाला. एका दुचाकीस्वाराला उडवून पळ काढणाऱ्या कार चालकाला महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकातील दोन महिला पोलिसांनी धाडस दाखवत पकडले. संजना पावसकर आणि कोमल धनगर अशी या दोन कर्तव्यदक्ष महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून, त्यांच्या या कामगिरीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास महेश एलमारे हे आपल्या दुचाकीने मुरबाड रोडवरून सुभाष चौकच्या दिशेने जात होते. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव सुझुकी कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की महेश एलमारे रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना मदत करण्याऐवजी कार चालक राजनसिंग चंदेल याने तिथून गाडी पळवली.
(नक्की वाचा- Iran Israel War: इराणमधील मिनाबच्या फोटोंनी जग हादरले, ट्रम्प यांची पुतणी देखील सुन्न)
महिला पोलिसांची तत्परता
याच दरम्यान परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या संजना पावसकर आणि कोमल धनगर यांची नजर या अपघातावर पडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या दुचाकीवरून कारचा पाठलाग सुरू केला.
1 किलोमीटरचा पाठलाग आणि अटक
रस्त्यावरील गर्दीतून मार्ग काढत या दोन महिला पोलिसांनी जवळपास 1 किलोमीटरचा पाठलाग करून त्या कारला गाठले. त्यांनी कार चालकासह त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतले. केवळ आरोपींना पकडून न थांबता, या महिला पोलिसांनी तातडीने जखमी महेश एलमारे यांना कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने महेश यांची प्रकृती आता स्थिर आहे.
(नक्की वाचा- T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?)
महात्मा फुले पोलिसांनी कार चालक राजनसिंग चंदेल याच्या विरोधात निष्काळजीपणाने वाहन चालवणे आणि अपघात करून पळ काढणे या कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दामिनी पथकाने अशाप्रकारे आज आपल्या कर्तव्यदक्षतेने एका निष्पाप नागरिकाचा जीव वाचवला आहे.