अमजद खान
वाहतूक कोंडीचा प्रश्न कल्याण डोंबिवलीत गंभीर बनला आहे. पाच मिनीटाचं अंतर कापायला तासन तास लागत आहेत. त्यामुळे सर्व शहरातील सामान्य नागरिक, विद्यार्थी, जेष्ट नागरिक, महिला हैराण झाले आहेत. रस्त्यांना पडलेल्या खुड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी होत होती. कल्याण डोंबिवली महापालिकेने वेळत हे खड्डे बुजवले नाहीत त्याचा हा परिणाम होत असल्याचा सुर निघत होता. शिवाय शहरात सुरू असलेल्या विकास कामामुळेही वाहतूक कोंडीला हातभार लागत आहेत. या वाहतूक कोंडीचा फटका वाहतूक पोलीसांनाही बसत होता. त्यातून वाहतूक पोलीस आयुक्तांनी थेट केडीएमसीला पत्र पाठवत तक्रारीचा सुर आवळला होता. तर आता केडीएमसीनेही मोकाट जनावरांचा प्रश्न पत्राच्याच माध्यमातून मांडत पोलीसांकडे बोट केले आहे.
कल्याणमधील ट्रॅफिक कमी करण्यासाठी केडीएमसीने लवकरा लवकर खड्डे बुजविले पाहिजेत, असे पत्र वाहतूक पोलिसांनी दिले होते. रस्त्यात असलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं या पत्रात म्हटलं होतं. त्यामुळे हे खड्डे केडीएमसीने लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. नागरिकांची वाहतूक कोंडीमुळे गैरसोय होत आहे. शिवाय पोलीसांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. हे खड्डे बुजवले तर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास या पत्रातून व्यक्त करण्यात आला होता. पत्राच्या माध्यमातून एक प्रकारे केडीएमसीला पोलीसांनी चिमटे काढले होते.
नक्की वाचा - Dombivali News: ती रडत होती मात्र सांगू शकत नव्हती, जेव्हा खरं कारण समजलं तेव्हा...
वाहतूक पोलीसांकडून आलेल्या यापत्रानंतर केडीएमसीच्याही पत्राची चर्चा सुरू झाली आहे. कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरं फिरत आहे. या जनावरांमुळे वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे पोलिसांनी या जनावरांच्या मालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावे. त्यातून रस्ते जनावरमुक्त होतील. त्यासाठी वाहतूक पोलीसांनी तातडीने कारवाई करावी असे पत्र केडीएमसीने पोलीसांना दिले आहे. अनेक ठिकाणी ही मोकाट जनावरे दिसतात. रस्त्यात ती कुठेही उभी राहातात. त्यांना कोणी मालक नसतो. अशा वेळी त्याचा थेट परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे असा युक्तीवाद केडीएमसीकडून या पत्रात करण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात खड्ड्यामुळे नागरीक त्रस्त आहे. या खड्डयांमुळे कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे नागरीकाना मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी लवकरात लवकर खड्डे भरले पाहिजे अशी मागणी नागरीकांकडून होतच आहे. कल्याण पश्चिमेतील वालधूनी पूल आणि सुभाष चंद्र बोस चौकातील वाहतूक कोंडी करीता खड्डे जबाबदार आहे. असे कल्याणचे वाहतूक शाखेचे एसीपी किरण बालवडकर यांनी महापालिकेस पत्र दिले होते. तर दुसरीकडे केडीएमसी सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी कल्याण पूर्वेतील मलंग रोडवर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोकाट जनावरांच्या मालकांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पत्र दिले आहे. यावरून दोन्ही संस्थामध्ये लेटरवॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात मात्र ट्रॅफिक बाजूलाच राहील्याची चर्चा कल्याणमध्ये रंगली आहे.