Kalyan News: कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात मुसळधार पावसादरम्यान प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. आपल्या लहान मुलांच्या तोंडी दोन सुखाचे घास पडावेत म्हणून घराबाहेर खाऊ आणण्यासाठी गेलेल्या एका 24 वर्षीय महिलेला रस्त्यावर पडलेल्या उघड्या वीज वाहिनीमुळे आपला जीव गमावावा लागला आहे. शशी राहुल चक्र असे या मृत दुर्दैवी महिलेचे नाव आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप लहान मुलांचे आईचे छत्र कायमचे हरपले आहे.
रस्त्यावर पसरला होता करंट
मिळालेल्या माहितीनुसार, शशी चक्र या आपले पती राहुल चक्र आणि दोन लहान मुलांसह कल्याण पूर्वेतील हनुमान नगर भागात राहत होत्या. बुधवारी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. याच दरम्यान मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या. मात्र, रस्त्यावर महावितरणची मुख्य वीज वाहिनी उघड्यावर तुटून पडलेली होती.
नक्की वाचा- VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)
पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण परिसरात विजेचा करंट पसरला होता. या पाण्यातून जात असताना शशी चक्र यांना विजेचा जोरदार झटका बसला. हा शॉक इतका भीषण होता की, शशी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांकडून 'खर्चा-पाण्याची' मागणी?
या संपूर्ण प्रकरणाचा तपास डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस करत आहेत. मात्र, या तपासादरम्यान पोलीस प्रशासनाला मान खाली घालावी लागेल असा खळबळजनक आरोप मृत महिलेचे पती राहुल चक्र यांनी केला आहे. "माझी पत्नी आम्हाला सोडून गेली, माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन लहान मुलं आईसाठी रडत आहेत. आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये कायदेशीर आणि शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेलो, तेव्हा तिथे असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आमच्याकडे थेट 'खर्चा-पाणी' देण्याची मागणी केली. हॉस्पिटलमध्ये काही खर्च करावा लागेल, आम्हाला काही द्यावं लागेल, असं तो म्हणाला.
(नक्की वाचा- हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार? आयपीएल ट्रेडच्या चर्चांवर 'CSK'च्या सीईओंचे स्पष्टीकरण)
महावितरण आणि लाचखोर पोलिसावर कारवाईची मागणी
पावसाळ्यापूर्वी महावितरणने उघड्या वीज वाहिन्या, उघडे डीपी बॉक्स दुरुस्त करणे बंधनकारक असतानाही हनुमान नगर भागात निष्काळजीपणा करण्यात आला. त्यामुळे या अपघाताला पूर्णपणे महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत नागरिकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याची निष्पक्ष चौकशी करून त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.