जाहिरात

हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार? आयपीएल ट्रेडच्या चर्चांवर 'CSK'च्या सीईओंचे स्पष्टीकरण

Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीगच्या 'ट्रेड विंडो' संदर्भात हार्दिक पांड्या सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सच्या अत्यंत सुमार कामगिरीनंतर हार्दिक मुंबई संघ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार? आयपीएल ट्रेडच्या चर्चांवर 'CSK'च्या सीईओंचे स्पष्टीकरण

आयपीएल 2026 चा हंगाम संपल्यानंतर आता आगामी हंगामासाठी पडद्यामागे खेळाडूंच्या खरेदी-विक्रीच्या म्हणजेच 'ट्रेड विंडो'च्या घडामोडींना वेग आला आहे. यामध्ये भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या  हे सध्या सर्वात मोठे नाव ठरत आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम अतिशय निराशाजनक राहिल्याने हार्दिक हा संघ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

त्यातच पाच वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी चुरस सुरू असल्याचा दावा केला जात होता. या संपूर्ण प्रकरणावर आता चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ (CEO) काशी विश्वनाथन यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, हार्दिक पांड्याला संघात समाविष्ट करण्याबाबत फ्रँचायझीमध्ये सध्या कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

MLC संपल्यानंतरच होणार आढावा बैठक

'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, "आमच्या संघात हार्दिक पांड्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आयपीएलच्या चालू हंगामाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतरच याबाबत विचार केला जाईल. ही आढावा बैठक अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट (MLC) संपल्यानंतरच आयोजित केली जाईल." विशेष म्हणजे, अमेरिकेतील 'मेजर लीग क्रिकेट 2026' स्पर्धा 18 जुलैपर्यंत चालणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचीच उपकंपनी असलेला 'टेक्सास सुपर किंग्स' हा संघ या स्पर्धेत खेळत असल्यामुळे सीएसकेचे व्यवस्थापन सध्या तिथे व्यस्त आहे.

(नक्की वाचा-  Pandharpur Special Train: आषाढी वारीसाठी 54 विशेष ट्रेनची घोषणा; पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि मार्ग)

कर्णधारपदासाठी हार्दिक योग्य पर्याय ठरू शकतो का?

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या मूळ अहवालानुसार, गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन संघ वगळता आयपीएलमधील इतर तब्बल 7 संघांनी हार्दिक पांड्याला आपल्या संघात ट्रेड करण्यासाठी रस दाखवला आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलचे गेले काही हंगाम खूपच खराब राहिले आहेत.

आयपीएल 2025 मध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर होता, तर आयपीएल 2026 मध्ये त्यांनी किंचित सुधारणा करत 8 वे स्थान पटकावले. सलग तीन हंगाम सीएसकेला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. ऋतुराज गायकवाडच्या खराब फॉर्ममुळे आणि सातत्याने अपयशी ठरलेल्या नेतृत्वामुळे क्रिकेट विश्वात त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्याचा अनुभव पाठीशी असलेला हार्दिक पांड्या हा चेन्नईसाठी कर्णधारपदाचा एक आदर्श आणि तगडा उमेदवार ठरू शकतो, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात आहे.

(नक्की वाचा-  VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)

गेल्या वर्षीचा हाय-प्रोफाइल ट्रेड

चेन्नई सुपर किंग्स ट्रेड विंडोमध्ये नेहमीच मोठे निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. गेल्या वर्षीही अशाच एका मोठ्या हाय-प्रोफाइल ट्रेडमध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार संजू सॅमसन चेन्नईमध्ये सामील झाला होता. तर चेन्नईचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्स संघात गेला होता. त्यामुळे आगामी काळात हार्दिक पांड्या  मुंबईतच राहतो की चेन्नई किंवा कोलकाता सारख्या संघात जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com