Kalyan News: कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सोडवण्यासाठी आणि शहराच्या विकासाला नवी गती देण्यासाठी सध्या हजारो कोटींच्या विकासकामांचा धडाका सुरू आहे. रस्ते पायाभूत सुविधा आणि मेट्रो प्रकल्पांमुळे येणाऱ्या काळात कल्याण आणि आसपासच्या परिसरातील दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे बदललेली पाहायला मिळणार आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच या वेगवेगळ्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. जवळपास 5000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
डबल डेकर उड्डाणपूल आणि प्रवासाचा वेग
कल्याणमधील वाहतूक अधिक सुटसुटीत करण्यासाठी नागपूरच्या धर्तीवर महापे ते राजनोली दरम्यान एक्सेस कंट्रोल डबल डेकर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 2800 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
हा पूल कार्यान्वित झाल्यानंतर महापे ते राजनोली हा प्रवास विना अडथळा पूर्ण करता येईल. याशिवाय दुर्गाडी ते अंबरनाथ या मार्गावरही अशाच प्रकारचा डबल डेकर उड्डाणपूल तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )
मेट्रोचे जाळे आणि रेल्वेवरील ताण होणार कमी
मेट्रो 12 च्या कामाला सध्या मोठी गती मिळाली आहे. विशेष म्हणजे मेट्रो 12 ची अलाईमेंट बदलून ती आता शीळफाट्यावरून तळोजाला नेण्यास मंजुरी मिळाली आहे. या बदलामुळे 27 गावे आणि दिवा परिसरातील नागरिकांना मेट्रोचा थेट लाभ घेता येईल. तसेच दुर्गाडीवरून उल्हासनगर आणि अंबरनाथपर्यंत मेट्रो 5 हा प्रकल्प देखील मंजूर झाला आहे.
हे पर्यायी वाहतुकीचे मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल आणि नागरिकांना प्रवासाचे उत्तम पर्याय उपलब्ध होतील.
( नक्की वाचा : Pune News: आता थेट उड्डाणपुलावरून धावणार पुणे मेट्रो; नगर रोडचा प्रवास होणार सुसाट! वाचा सर्व माहिती )
ऐरोली ते काटई प्रवास अवघ्या 15 मिनिटांत
डोंबिवली आणि कल्याणमधील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ऐरोली ते काटई हा फ्री वे प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे. यातील मुंब्रा पर्यंतचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी 900 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
हा मार्ग पूर्ण झाल्यावर ऐरोली ते काटई हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊन तो केवळ 15 मिनिटांवर येईल. यासोबतच शीळ फाटा येथे अंडरपास तयार केला जाणार असल्याने तेथील वाहतूक कोंडीची गुंतागुंत सुटण्यास मदत होणार आहे.
रिंग रोड आणि पुलांच्या कामांना वेग
शहरांतर्गत वाहतुकीसाठी रिंग रोडचा तिसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. दुर्गाडी ते मोठा गाव या दरम्यानच्या कामासाठी भूसंपादनाचे अडथळे दूर करण्यासाठी एमएमआरडीए आणि केडीएमसीची संयुक्त बैठक येत्या काही दिवसांत होणार आहे. रिंग रोडचा टप्पा 2 पूर्ण झाल्यावर काटई ते टिटवाळा हा प्रवास केवळ काही मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल.
त्याचबरोबर तिसऱ्या पत्री पुलाचे आणि पलावा रेल्वे उड्डाणपुलाचे काम येत्या 2 ते 3 महिन्यात पूर्ण होईल. पलावा पुलासाठी रेल्वेच्या मेगाब्लॉकची परवानगी मिळताच गर्डर लाँचिंगचे काम हाती घेतले जाईल, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world