जाहिरात

Kalyan Shocking News: गर्दीचा थरार की विकृती? कल्याण स्टेशनवर डब्यात चढताना महिलेसोबत भयंकर घडलं...

Kalyan News: कल्याण स्थानकावर लोकलमध्ये चढताना झालेल्या वादात एका अज्ञात महिलेने महिला प्रवाशाच्या हाताचा चावा घेतला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू आहे.

Kalyan Shocking News: गर्दीचा थरार की विकृती? कल्याण स्टेशनवर डब्यात चढताना महिलेसोबत भयंकर घडलं...

Kalyan News: कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलच्या गर्दीतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल प्रवासात दररोजची गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतत असतानाच, आता प्रवाशांमधील हिंसक वृत्तीही समोर येऊ लागली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी डब्यात चढण्यावरून झालेल्या वादात एका महिलेला दुसऱ्या महिलेने चक्क चावा घेऊन तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे नेमकी घटना?

कल्याण पूर्वेकडील मलंगगड रोड परिसरात राहणाऱ्या प्रियंका थोरात या अंधेरी येथे नोकरीला आहेत. मंगळवारी सकाळी त्या कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होत्या.

(नक्की वाचा- Pune News: पुण्यात 'मुले पळवणारी टोळी' सक्रिय? पुणे पोलिसांचे नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी)

लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने काही महिला उतरत होत्या तर काही चढत होत्या. यादरम्यान डब्यातून उतरणाऱ्या एका अज्ञात महिलेने प्रियंका यांना चढण्यास मज्जाव केला. प्रियंका यांनी डब्यात शिरण्याचा प्रयत्न केला असता, त्या अज्ञात महिलेने त्यांना बाहेर ढकलले आणि झटापटीत प्रियंका यांच्या दंडाला जोरात चावा घेतला. एवढ्यावरच न थांबता तिने प्रियंका यांचे बोट पिरगळले, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.

कामाच्या ओढीने प्रवास, रात्री तक्रार

दुखापत होऊनही कामावर उशीर होऊ नये म्हणून प्रियंका यांनी त्याच लोकलने प्रवास केला. मात्र, संध्याकाळी डॉक्टरांकडे तपासणी केली असता बोटाला गंभीर इजा झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात (GRP) धाव घेऊन तक्रार नोंदवली.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

पोलिसांकडून सीसीटीव्हीचा तपास

कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फलाट क्रमांक 6 वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपी महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com