Kalyan News: कल्याणमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्या तबेला मालकांना महापालिका प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. वारंवार सूचना देऊनही ड्रेनेज लाईनमध्ये शेण टाकून रस्ते आणि गटारे तुंबवणाऱ्या 21 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिम भागातील अनेक नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर पसरणारी घाण आणि तुंबलेल्या ड्रेनेज लाईनबाबत तक्रारींचा पाऊस पाडला होता. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आरोग्य अधिकारी जितेंद्र यादव यांनी संबंधित परिसराची पाहणी केली. या पाहणीत अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला.
गोविंदवाडी आणि रेती बंदर परिसरातील तबेला मालक आपल्या म्हशींचे शेण आणि इतर कचरा कोणत्याही प्रक्रियेविना थेट महानगरपालिकेच्या मुख्य ड्रेनेज लाईनमध्ये सोडत होते. यामुळे सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली होती.
( नक्की वाचा : KDMC News: केडीएमसीमध्ये लाचखोरीची पन्नाशी पूर्ण! 40 हजारांसाठी लिपिकाने स्वाभिमान विकला )
सूचनांकडे दुर्लक्ष
महापालिका प्रशासनाने यापूर्वी या तबेला मालकांना अनेकदा लेखी नोटिसा बजावल्या होत्या. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा किंवा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा, अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, या नोटिसांना केराची टोपली दाखवत तबेला मालकांनी आपली मनमानी सुरूच ठेवली. ड्रेनेजमध्ये शेण साचल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती, ज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता.
अखेर महापालिका प्रशासनाने याप्रकरणी कठोर भूमिका घेण्याचे ठरवले. उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात या 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक स्वच्छतेत अडथळा निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या विविध कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने या निमित्ताने दिला आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात चिमुरडीवर अत्याचार करुन जीव घेणारा तो नराधम निघाला सराईत वासनांध; सख्खी पुतणीही होती शिकार )
या कारवाईने तबेला मालकांचे धाबे दणाणले असून, आता तरी शहरातील सांडपाणी व्यवस्था सुरळीत होणार का, याकडे कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील 21 आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
1) अनस मौलवी
2) मकसूद खोत
3) शाहिद मौलवी
4) अफसर मौलवी
5) सलीम पठाण
6) फलिम मौलवी
7) इतलाक मौलवी
8) हमजा मौलवी
9) शादाब मौलवी
10) मौनी मिरसिंद
11) निसार मौलवी
12) शरफुददीन कर्ते
13) जलील डोन
14) इरफान कर्ते
15) मुजम्मील कर्ते
16) एजाज कर्ते
17) मजाज मौलवी
18) मुंडाविल कारेल
19) मोईन मकसूद मिरसिंगे
20) सरवर मौलवी
21) गुलाम अकबर कर्ते
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world