Kalyan News: कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेमध्ये मंगळवारी रात्री चक्क बैठकीदरम्यान मोठा राडा झाला. एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना अचानक वातावरण तापलं आणि वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. या घटनेत दोन पदाधिकाऱ्यांनी खुद्द जिल्हाप्रमुख आणि त्यांच्या समर्थकांवर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात शिवसेना ठाकरे गटाची शाखा आहे. या शाखेत मंगळवारी रात्री पक्षाच्या सहसंपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पक्षातील अंतर्गत विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्व जमले होते, मात्र बैठकीला सुरुवात होण्यापूर्वीच तिथे वादाची ठिणगी पडली. बघता बघता या वादाचे रूपांतर मोठ्या गोंधळात झाले. शाखाप्रमुख सोमनाथ भोईर आणि देवेंद्र प्रसाद यांनी आरोप केला आहे की, त्यांच्यावर जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला.
( नक्की वाचा : KDMC मध्ये समाजकंटक आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अनधिकृत होर्डिंगचा धंदा, भाजपा नगरसेवकाचा मोठा आरोप )
बाहेरून मुले बोलावून मारहाणीचा आरोप
या घटनेनंतर शाखाप्रमुख सोमनाथ भोईर यांनी आपली बाजू मांडताना गंभीर आरोप केले आहेत. भोईर यांच्या दाव्यानुसार, जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि त्यांचे पुतणे धनराज पाटील यांनी जाणीवपूर्वक बाहेरून 60 ते 70 तरुणांना तिथे बोलावून घेतले होते. या तरुणांचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला असून, हे सर्व तरुण नशेखोर होते असंही त्यांनी म्हटलं आहे.
या जमावाने शाखेत घुसून आपल्याला आणि देवेंद्र प्रसाद यांना बेदम मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकाराची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली असून आता पक्ष काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( नक्की वाचा : Ulhasnagar News: लग्नानंतर अचानक समोर आला बुरखा अन् गोमांस; उल्हासनगरच्या हिंदू मुलीचा बिहारमध्ये भयंकर छळ )
20 वर्षे पक्षाशी इमान राखणाऱ्यावर का झाली मारहाण?
या वादात मारहाण झाल्याचा दावा करणाऱ्या देवेंद्र प्रसाद यांनी खंत व्यक्त केली आहे. प्रसाद हे गेल्या 20 वर्षांपासून पक्षात सक्रिय आहेत. मात्र, महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांच्या पत्नीने काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. याच विषयावरून त्यांची बाजू मांडण्यासाठी ते या बैठकीला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांना मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निष्ठावान कार्यकर्त्यावर अशा प्रकारे हात उचलला गेल्याने कोळशेवाडी परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी फेटाळले सर्व आरोप
दुसरीकडे, जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी मारहाणीचे हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पाटील यांनी सांगितले की, बैठकीत केवळ महापालिका निवडणुकीत पक्षाशी दगाबाजी केल्याच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद झाला. ज्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, तेच या बैठकीला आल्यामुळे काही पराभूत उमेदवारांमध्ये रोष होता. त्यातून केवळ किरकोळ झटापट झाली असून कोणालाही मारहाण झालेली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. जुन्या वादाचा हा केवळ एक उद्रेक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ शिवसैनिकांकडून तीव्र संताप
शाखेत झालेल्या या राड्यावर जुन्या आणि ज्येष्ठ शिवसैनिकांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तब्बल 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे ज्येष्ठ शिवसैनिक शांताराम दिघे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. शाखेमध्ये अशा प्रकारे कधीही वादावादी किंवा मारहाणीची घटना घडली नव्हती, असे त्यांनी आवर्जून सांगितले. जे काही घडले ते अत्यंत निंदनीय असून यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या राड्यानंतर कल्याणमधील ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world