अमजद खान
एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. यात एका 14 वर्षाच्या मुलीने थेट 19 व्या माळ्यावरून उडी घेत आपले जिवन संपवले आहे. ही मुलगी आठवी इयत्तेत शिकत होती. कल्याणच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार तिच्या मोठया बहिणी समोर घडला. मृत मुलीचे नाव रिद्धी खराडे आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. शिवाय इमारतीतील लोकांनी हळहळ ही व्यक्त केली आहे.
कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल सोसायटी रौनक सिटी या इमारतीत एक मुलगी इमारतीवरुन खाली पडली. घटना घडताच लोक जमा झाले. खडकपाडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. नेमका काय प्रकार घडला आहे ? याची माहिती घेण्यास पोलिसंनी सुरु केली. कारण मुलगी पडल्यानंतर तिचे नातेवाईक तिला घेऊन नेमके कोणत्या रुग्णालयात गेले याची माहिती कोणालाच नव्हती.
थोड्याच वेळात मुलीची आई आणि बहिण समोर आल्या. रिद्धी खराडे नावाची मुलगी उल्हासनगरातील एका बड्या नामांकित शाळेत शिकते. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रिद्धी हिचा आज शाळेत ओपन डे होता. तिने जी परिक्षा दिली होती, तिला त्याचे मार्क्स दाखविले गेले. ती सकाळी शाळेत गेली होती. शाळेतून ती दुपारी घरी परतली. शाळेतून आल्यानंतर ती चिंतेत होती. शाळेतील ओपन डे कार्यक्रमास तिची बहिणीही गेली होती.
तिची आई ठाण्याला कामाला असल्याने ती कामावर गेली होती. ती तिच्या आई बहिण आणि आजीसोबत राहते. शाळेतून तिला टेन्शन आले. तिने तिच्या बहिणीसमोरच 19 व्या मजल्यावर उडी मारुन तिचे जीवन संपविले. या घटनेमुळे रौनक सिटी परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. परिक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. मात्र पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत.