जाहिरात

Kalyan News : कल्याणच्या काळा तलावातील घटनेनंतर महापौरांचा संताप अनावर, अधिकाऱ्यांना विचारला थेट सवाल

Kalyan News : महापौर हर्षाली चौधरी यांनी त्यांच्या कार्यालयात स्मार्ट सिटी आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.

Kalyan News : कल्याणच्या काळा तलावातील घटनेनंतर महापौरांचा संताप अनावर, अधिकाऱ्यांना विचारला थेट सवाल
Kalyan News : महापौरांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
कल्याण:

Kalyan News : कल्याणमधील प्रसिद्ध काळा तलावात एका अल्पवयीन मुलीने उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेची ढिसाळ सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. तलावाभोवती लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि पथदिवे बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या हलगर्जीपणावर महापौर आणि नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहे.

तलावाच्या सुरक्षेचा बोजवारा; सीसीटीव्ही अन् दिवे बंद

कल्याण पश्चिम येथील काळा तलावात 17 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असले, तरी तलाव परिसरातील सुरक्षेचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. या तलावाची सुरक्षा आणि देखभालीचे कंत्राट एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. तरीही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असतात आणि सुरक्षारक्षक गायब असतात, ज्यामुळे असा प्रकार घडल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

( नक्की वाचा : Ambernath : अंबरनाथ-उल्हासनगर प्रवासादरम्यान प्रवाशांचा जीव टांगणीला; गार्डच्या नजरेने टळला मोठा रेल्वे अपघात )

महापौर हर्षाली चौधरी अधिकाऱ्यांवर भडकल्या

तलावातील या घटनेनंतर मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर महापौर हर्षाली चौधरी यांनी त्यांच्या कार्यालयात स्मार्ट सिटी आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर नागरिक सुरक्षित नसतील, तर त्या खर्चाचा उपयोग काय? असा थेट सवाल करत महापौर आणि नगरसेवक गणेश लांडगे यांनी निष्काळजी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

( नक्की वाचा : Nagpur News :नागपुरात शाळेत पाणीच पाणी, 800 चिमुकले पाण्यात अडकले; पालकांनी जीवाची बाजी लावून वाचवले, VIDEO )

केडीएमसीच्या सुरक्षेवर वारंवार प्रश्नचिन्ह

महापालिकेच्या सुरक्षेचा बोजवारा उडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि नर्सला मारहाण केली होती, तेव्हाही सुरक्षारक्षक मूकप्रेक्षक बनले होते. याशिवाय रुक्मिणीबाई रुग्णालयात भटके कुत्रे बिनधास्त फिरत असल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पालिका ठिकठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांवर कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र ते नेमकी काय जबाबदारी पार पाडतात, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. काळा तलावातील घटनेनंतर सुरक्षेतील त्रुटी दूर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com