अमजद खान
कल्याण पोलिसांच्या ताफ्यात सर्व सुविधांनी सुसज्ज अशी अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे. या व्हॅनमुळे कल्याण परिसरातील गुन्हे तपास आणि प्रकटीकरण प्रक्रियेला अधिक वेग तसेच वैज्ञानिक संरक्षण प्राप्त होणार आहे. कल्याण पोलिसांच्या परिमंडळ 3 अंतर्गत महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी, खडकपाडा, डोंबिवली, विष्णुनगर, मानपाडा आणि टिळकनगर असे एकूण 8 पोलीस ठाणे येतात. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांची तात्काळ तपासणी करण्यासाठी ही व्हॅन कार्यरत राहणार आहे.
या फॉरेन्सिक व्हॅनमध्ये सहाय्यक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक सहाय्यक तसेच प्रशिक्षित प्रयोगशाळा तज्ज्ञ उपलब्ध आहेत. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांचे भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजिटल विश्लेषण, उच्च प्रतीच्या फॉरेन्सिक उपकरणांच्या सहाय्याने करणे सोयीस्कर होणार आहे. त्यासोबतच घटनास्थळ तपासणी किट्स, नमुना संकलन साधने आणि अत्याधुनिक वैज्ञानिक सामग्रीमुळे प्राथमिक अहवाल तयार करण्याची प्रक्रियाही अधिक वेगवान होणार आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
तर फॉरेन्सिक व्हॅनच्या उपलब्धतेमुळे घटनास्थळी पुरावे तात्काळ गोळा करणे शक्य होणार आहे. तपास अधिक वेगवान - पारदर्शक, आरोपींविरोधातील ठोस - वैज्ञानिक पुरावे न्यायालयात सादर करण्यास मोठी मदत मिळणार असल्याने गुन्हे उकलण्याचे प्रमाणही वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन आठवड्यातील दोन दिवस तर कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी 24 तास कल्याणच्या पोलीस नियंत्रण कक्ष येथे उपलब्ध राहणार आहे. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सेवा मोठा सक्षम दुवा ठरणार असल्याचेही पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले.