अमजद खान
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 6500 कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने बोनस जाहीर केला आहे. दिवाळीत केडीएमसी कर्मचाऱ्यांना बोनस मिळावी अशी मागणी कर्मचारी संघटनांनी आयुक्तांकडे केली होती. शेवटी त्यांच्या या मागणीला यश आले आहे. आता प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवाळीचा 20 हजार रूपये बोनस मिळणार आहे अशी माहिती परिवहन कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला 25 हजार रूपये बोनस द्यावा अशी मागणी कामगार संघटनांनी केली होती.
दर वर्षी केडीएमसी कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून बोनस दिला जातो. यंदा कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये बोनस देण्यात यावा अशी मागमी संघटनेच्यावतीने केडीएमसी आयुक्तांकडे करण्यात आली होती. या मागणीवर मंगळवारी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी 19 हजार 500 रुपये बोनस दिला गेला होता. यंदा कामगार संघटनेच्या मागणीनुसार 25 हजार रुपये बोनस देता येणार नाही. त्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत बोसनमध्ये 500 रुपयांची वाढ करुन प्रत्येक कर्मचाऱ्याला 20 हजार रुपये बोनस दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे.
या बैठकीनंतर 20 हजार रुपये बोनस मिळणार असल्याची माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली आहे. महापालिका कर्मचारी, परिवहन कर्मचारी आणि शिक्षक अशा एकूण 6 हजार 500 जणांना या बोनसचा लाभ मिळणार आहे.बोनसच्या चर्चे व्यतिरिक्त शहरातील विविध समस्यांबाबत आयुक्तांसोबत पाटील यांनी चर्चा केली. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे. काही ठिकाणी रस्ते विकासाची कामे सुरु आहे. अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नाही. रस्ते प्रकल्पातील बाधितांना घरे देण्याचे विषय प्रलंबित आहे. बीएसयूपी प्रकल्पातील घरे सुस्थितीत करुन ती रस्ते प्रकल्पातील बाधितांना देण्यात यावी यावर ही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे कामगार संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
नागरीकांच्या अनेक तक्रारी आहेत. शहरातील फूटपाथ फेरीवाल्यांनी व्याप्त आहे. त्यामुळे नागरीकांना चालण्यासाठी फूटपाथ मोकळे नाही. अतिक्रमण करण्यात आलेले फूटपाथ अतिक्रमण मुक्त करुन नागरिकांकरीता चालण्यासाठी मोकळे करुन द्यावेत. स्टेशन परिसरातील विकास प्रकल्प आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण करावे. या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरु असल्याने स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होते. नागरीकांना कामावर जाताना त्रास होतो. या विविध विषयावर आयुक्तांसोबत चर्चा झाली. या सगळ्या समस्या मार्गी लावण्यात याव्या. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या जातील असे आश्वासन पाटील यांना दिले आहे .