
अमजद खान
महाराष्ट्रात पहीले मराठी असा सर्वांचाच आग्रह आहे. पण मराठी भाषा बोलणार नाही अशी मुजोरी करणारे अनेक जण सापडतात. त्यानंतर त्यांचा तिथल्या तिथे माज उतरवला ही जातो. अशा घटना या आधी ही घडल्या आहेत. त्याचे व्हिडीओ ही व्हायरल झाले आहेत. त्यानंतर मराठी बोलण्यास नकार देणारे मराठी ही बोलले आणि मराठी शिकल्याचेही पाहीले. काहींवर तर कारवाई ही झाली. असं असताना आता पुन्हा एकदा एका परप्रांतिय महिनेने मराठी बोलणार नाही असं सांगत थेट अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा माज तिथल्या तिथे उतरवण्यात आला. ही घटना कल्याणच्या डी मार्टमध्ये घडली. त्याचा व्हिडीओ ही व्हायरल होत आहे.
कल्याणच्या डी मार्टमध्ये मराठी माणूस आणि मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरल्याने वादंग झाला. एका परप्रांतीय महिलेने डी मार्टमध्ये काम करणाऱ्या एका तरुणासोबत मराठी बोलणार नाही या कारणावरुन हुज्जत घातली. त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने थेट तिथे धडक दिली. कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या महिलेस धारेवर धरले. अखेर या महिलेने माफी मागितल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले.
कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात डी मार्ट आहे. या डी मार्टमध्ये एक परप्रांतीय महिला खरेदी करण्यासाठी आली होती. खरेदी दरम्यान या महिलेचा डी मार्टमधील एका कर्मचाऱ्यासोबत वाद झाला. ही महिला हिंदीत बोलत होती. त्यामुळे कर्मचाऱ्याने त्या महिलेस सांगितले की, तुम्ही मराठीत बोला. ही महिला चिडली. मी हिंदीच बोलणार. तुला देखील हिंदीत बोलावे लागेल. त्यानंतर महिला तरुणा सोबत हुज्जत घालू लागली. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कांचन खरे या देखील होत्या.
कांचन यांनी देखील महिलेला समजावत तिला मराठीत बोला असे सांगितले. संतप्त महिला मराठी बोलण्यास नकार देत कांचन यांच्या अंगावर धावून आली. याच दरम्यान मनसेची कार्यकर्तेही त्याठिकाणी पोहचले. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या महिलेस चांगलेच धारेवर धरले. जवळ पास एक तास हा गोंधळ डी मार्ट समोर सुरु होता. अखेर या महिलेने माफी मागितली. आपली चूक झाल्याचं तिने मान्य केलं. याच वेळी कल्याणचे खडकपाडा पोलिस त्या ठीकाणी दाखल झाले होते. पोलिसांनी या महिलेसा ताब्यात घेऊन रात्री उशिरा सोडून दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world