Kalyan News : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीचा आणि धडक कारवायांचा धसका अनेकांनी घेतला आहे. या धडक कारवायांमुळे बाजारात गुटखा मिळत नसल्याच्या रागातून कल्याणमधील एका व्यक्तीने थेट तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीने आयुक्तांना चक्क शिवीगाळ करत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. मात्र, हा व्हिडिओ समोर येताच कल्याण पोलिसांनी अवघ्या 4 तासांत या व्यक्तीला शोधून काढत बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्या दुर्गाप्रसाद पांडे याला ताब्यात घेतले आहे. दुर्गाप्रसाद पांडे हा कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात राहणारा असून तो व्यवसायाने ओला कॅब चालक आहे. पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला अत्यंत वेगाने अटक केली आहे.
( नक्की वाचा : Pune News:सियाच्या अफेयरची घरातील मंडळींना होती कल्पना, 35 वर्षांच्या मैत्रीमध्ये कुणी कालवलं विष? वाचा... )
काय आहे रागाचं कारण?
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दुर्गाप्रसाद हा गेल्या काही दिवसांपासून बाजारात गुटखा उपलब्ध होत नसल्याने प्रचंड नाराज होता. त्यातच त्याच्या वडिलांची एक पानटपरी होती, ती देखील प्रशासकीय कारवाईत बंद करण्यात आली होती. गुटखा मिळत नसल्याचा आणि टपरी बंद झाल्याचा सर्व राग त्याने थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर काढला. त्याने आपल्या मोबाईलवर एक आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला.
तुकाराम मुंढे यांच्यात धमक असेल तर त्यांनी थेट गुटखा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून दाखवावी, छोट्या पानटपऱ्यांवर कारवाई करू नये, असे आव्हान दुर्गाप्रसादने या व्हिडिओत दिले होते. एवढ्यावरच न थांबता त्याने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मुंढे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली आणि हा सर्व कारवाईचा प्रकार केवळ 2 ते ढाई महिनेच चालेल, असा दावाही त्याने या व्हिडिओत केला होता.
( नक्की वाचा : Pune : आधी पासपोर्ट चोरीला, मग लोहगडावर नेलं..केतनच्या वडिलांनी सांगितलं सियानं कसं केलं होतं हत्येचं प्लॅनिंग )
पोलिसांनी 4 तासात ठोकल्या बेड्या
हा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि पोलीस अधिकारी भूषण देवरे यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 4 तासांच्या आत आरोपी दुर्गाप्रसाद पांडे याचा शोध लावला आणि त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.