Kalyan News: कल्याणमध्ये भोंगळ कारभार! 'या' गोष्टीमुळे हजारो लोक वेठीस, मोठ्या कंपनीचं धक्कादायक वास्तव उघड

Kalyan News: कल्याणजवळील मोहने भागात भोंगळ कारभारामुळे हजारो ग्राहक वेठीस. पूर्वकल्पना न दिल्याने परिसरात खळबळ उडालीय. शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांचा आंदोलनाचा इशारा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Kalyan News: कल्याणमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर"
NDTV Marathi

- अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan News:
देशभरात एका बाजूला घरगुती गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेवरून चर्चा सुरू असताना, कल्याणजवळील मोहने परिसरात एचपी (HP) गॅस एजन्सीचा अतिशय संतापजनक आणि भोंगळ कारभार समोर आला आहे. ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांची कनेक्शन्स दुसऱ्या एजन्सीत वर्ग केल्यामुळे हजारो नागरिक गॅस सिलिंडरपासून वंचित राहिले आहेत. या प्रकारामुळे संतप्त झालेले नागरिक आणि शिवसेना नगरसेवक यांनी एजन्सीवर धाव घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कल्याणमध्ये नेमके काय सुरू आहे? 

मोहने परिसरातील हजारो ग्राहक गेल्या अनेक वर्षांपासून 'न्यू रिलॅक्स एजन्सी'चे सेवा घेत होते. पण अचानक कोणत्याही अधिकृत सूचना किंवा मेसेजशिवाय या ग्राहकांना 'द नाराकार को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर सोसायटी' या दुसऱ्या एजन्सीमध्ये वर्ग करण्यात आले. अनेक ग्राहकांनी महिनाभरापूर्वी सिलिंडर बुकिंग केले होते, पण आता एजन्सी बदलल्याचे कारण सांगून त्यांना पुन्हा नव्याने बुकिंग करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून सिलिंडरच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

Advertisement

(नक्की वाचा: CCTV Video: पुण्यात प्रवास करताना सतर्क राहा! भरदिवसा घडलेल्या घटनेनं प्रवाशांमध्ये दहशत, तुम्ही ही चूक करताय का?)

काळाबाजार आणि उद्धट वर्तणुकीचे आरोप

या गोंधळात एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचे चित्र आहे. एका वृद्ध महिलेने आरोप केला आहे की, सिलिंडरसाठी डिलिव्हरी बॉयने त्यांच्याकडे तब्बल 3 हजार रुपयांची मागणी केली. "कायदेशीर मार्गाने सिलिंडर मिळत नसेल, तर ब्लॅकने (काळ्या बाजारात) घ्या," असे सल्ले एजन्सीकडून दिले जात असल्याचा आरोपही संतप्त ग्राहकांनी केला आहे. इतकेच नव्हे तर हक्काचा गॅस मागण्यासाठी गेलेल्या ग्राहकांशी एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनी अत्यंत उद्धटपणे वाद घातला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

(नक्की वाचा: Nashik News: नाशिक हादरले! ट्रकने 100 फूट फरफटत नेले अन् पिकअप व्हॅनला लागली भीषण आग, 4 जणांचा जळून मृत्यू)

शिवसेना आक्रमक; आंदोलनाचा इशारा

घटनेची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांनी आपल्या समर्थकांसह आणि पीडित ग्राहकांसह एजन्सी गाठली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता तिथेही शाब्दिक चकमक उडाली. "जर येत्या काळात ग्राहकांना सुरळीतपणे आणि वेळेवर सिलिंडर मिळाले नाही, तर शिवसेना स्टाइलने तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आता या प्रकरणात गॅस कंपनीचे उच्च अधिकारी काय दखल घेतात आणि ग्राहकांचा हा वनवास कधी संपतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement