जाहिरात

Kalyan News: शिंदे गटाच्या नेत्याने निवडणूक आयोगाच्या आधीच महापालिका निवडणुकीची तारीख केली जाहीर

निवडणुकीच्या तारखा राज्य निवडणूक आयोग जाहीर करत असतो. पण त्या आधीच शिंदे गटाच्या नेत्याने तारीख जाहीर केली आहे.

Kalyan News: शिंदे गटाच्या नेत्याने निवडणूक आयोगाच्या आधीच महापालिका निवडणुकीची तारीख केली जाहीर
कल्याण:

अमजद खान 

केडीएमसी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यात शिवसेना नारी शक्ती मेळाव्या दरम्यान शहर प्रमुख रवी पाटील यांनी केलेल्या निवडणूकीच्या दाव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहर प्रमुख पाटील यांनी थेट निवडणूकीची तारीख जाहिर केली आहे. निवडणूक 15 जानेवारी होणार असल्याचं त्यांनी सांगून टाकलं आहे.  तर आचारसंहिता 13 डिसेंबरच्या आत लागणार असल्याचं ही विधान त्यांनी केले आहे. इतकेच नाही तर या मेळाव्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी नाव न घेता माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर सडेतोड टिका केली आहे. युती झाली नाही तर भाजपला आडवे करण्याची भाषा केली आहे. 

कल्याणमध्ये केडीएमसी निवडणूकीची तयारी शिवसेना शिंदे गटाने आघाडी घेतली. शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले आणि महिला आघाडीच्या नेत्रा उगले यांनी आज ठाणकर पाडा येथे नारी शक्ती मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्या दरम्यान शहर प्रमुख रवी पाटील यांनी निवडणूकीच्या तयारी संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले. निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ नारी शक्ती मेळाव्याच्या निमित्ताने फोडला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सगळ्यांनी कामाला लागला. निवडणूक 15 जानेवारीला होणार आहे. तर 13 डिसेंबरच्या आत निवडणूकीची आचारसंहिता लागू होणार असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तयारीसाठी अत्यंत कमी वेळ आपल्या हाती असल्याचे त्यांनी सांगितले.

नक्की वाचा - Dombivli News: महिला डॉक्टरवर स्वत:ला कोंडण्याची वेळ, शास्त्रीनगर रुग्णालयातील प्रकार, धक्कादायक कारण

निवडणुकीच्या तारखा राज्य निवडणूक आयोग जाहीर करत असतो. नुकतीच नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका अजूनही जाहीर व्हायच्या आहेत. महापालिका निवडणुकी कधी होणार याचीही प्रतिक्षा आहे. फेब्रुवारीच्या आत सर्व निवडणुकी होतील असं बोललं जात आहे. त्याच्या तारखा मात्र गुलदस्त्यात आहेत. मात्र असं असलं तरी सत्ताधारी शिंदे गटाच्या नेत्याने निवडणूक आयोगाच्या आधीच महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे एक वेगळीच चर्चा कल्याण डोंबिवलीत रंगली आहे. त्यामुळे हे सर्व फिक्स आहे की काय अशी ही चर्चा होत आहे. 

नक्की वाचा - Ajay Devgn: अजय देवगण दिवसातून किती वेळा दारू घेतो? ब्रँड,वेळ, अन् किंमतही सांगितली

दरम्यान या मेळाव्या दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर सडेतोड टिका केली आहे. शिवसेनेचे दहा बंडखोर उभे होते. त्यामुळे गळ्यात आमदारकीची झालर पडली. हे विसरु नको. शिवसेनेच्या जिवावर श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते भेटायचे. शिवसेनेच्या शिलेदारांवर वार करायचे हा दुटप्पी खेळ शिवसेनेचा नाही. युती होऊ की नाही. मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली  पॅनल दणदणीत विजय होणार आहे. भाजप सोबत युती झाली नाही तर आम्ही भाजपला आडवे पाडणार असे वक्तव्यही मोरे यांनी केले आहे. त्यांनी पवार यांच्यावर केलेल्या टिके संदर्भात पवार हे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com