जाहिरात

Kalyan News: कल्याणमध्ये ठाकरे गटाचा 'सेल्फ गोल'? नगरसेवकाच्या हकालपट्टीवरून पक्षातच संभ्रम!

Kalyan News: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या संदर्भातील पेच चांगलाच चर्चेत आला आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये ठाकरे गटाचा 'सेल्फ गोल'? नगरसेवकाच्या हकालपट्टीवरून पक्षातच संभ्रम!
Kalyan News:नेत्यांच्या या परस्परविरोधी विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे.
कल्याण:

Kalyan News:  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या संदर्भातील पेच चांगलाच चर्चेत आला आहे. म्हात्रे यांच्यावर नेमकी कोणती कारवाई झाली आहे, यावरून पक्षातच दोन वेगळे सूर उमटताना दिसत आहेत. पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे की त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, यावरून शिवसैनिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे. मात्र दुसरीकडे केडीएमसीतील ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी म्हात्रे यांच्या प्रभागात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवत अपात्रतेच्या कारवाईचे संकेत दिले आहेत. नेत्यांच्या या परस्परविरोधी विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे.

Latest and Breaking News on NDTV

पक्षातील अंतर्गत हालचालींचा इतिहास

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले होते. मात्र मतमोजणीनंतर यातील 3 नगरसेवक पक्षाच्या संपर्कात नसल्याचे समोर आले होते. 


( नक्की वाचा : Ambernath News: अंबरनाथमध्ये महायुतीत ठिणगी, आमदारांनी पाठवलेल्या गुढ्या भाजपा नगरसेवकांकडून परत, कारण काय? )

हे तिन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने संबंधित नगरसेवकांना नोटिसा पाठवून कारवाईचा इशारा दिला होता.

या 3 नगरसेवकांपैकी रोहिणी कोटे आणि स्वप्नाली केणे या दोन नगरसेविकांनी पुन्हा ठाकरे गटात सक्रिय होत गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसराचे प्रतिनिधित्व करणारे मधुर म्हात्रे यांनी गट नोंदणीसाठी कोकण भवन येथे येण्याचे आश्वासन देऊनही ते तिथे फिरकले नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांनी पक्षविरोधी पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

( नक्की वाचा : Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवर आता ट्रॅफिक विसरा! 1 जूनला काय घडणार? वाचा सविस्तर )
 

कायदेशीर पेच आणि नेत्यांमधील विसंगती

मधुर म्हात्रे यांच्यावरील कारवाईवरून आता कायदेशीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली असेल, तर तांत्रिकदृष्ट्या त्यांच्यावर पक्षाचा व्हीप लागू होऊ शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. पक्षातून काढल्या गेलेल्या सदस्याला अपात्र ठरवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. अशा स्थितीत गटनेते उमेश बोरगावकर यांनी अपात्रतेची भाषा केल्याने पक्षाची नेमकी रणनीती काय आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

एकीकडे सचिव स्तरावरून हकालपट्टीचे आदेश निघणे आणि दुसरीकडे स्थानिक गटनेत्याने पोटनिवडणुकीची शक्यता वर्तवणे, यामुळे ठाकरे गटातील समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. नेत्यांमधील हे मतभेद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतात. म्हात्रे यांच्या प्रकरणातील हा संभ्रम नेमका कोणाच्या फायद्यासाठी आहे, याची चर्चा आता कल्याणच्या राजकीय गल्लीबोळात सुरू झाली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com