अमजद खान
Kalyan News: स्विमिंग ट्रेनरच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे कारण पुढे करत कल्याण डोंबिवली महाालिकेचे अधिकारी मुलांना स्विमिंगचे प्रशिक्षण देण्यापासून एका स्विमर ट्रेनरला रोखत होते. हा प्रकार कळताच शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी क्रीडा संकुलात धाव घेतली. त्याठिकाणी स्विमिंग ट्रेनरला प्रवेश मिळवून दिला. अधिकारी वर्गास चांगलेच धारेवर धरत स्विमिंग ट्रेनरला पुन्हा मज्जाव केल्यास शिवसेना स्टाईलने धडा शिकविण्याचा इशारा कदम यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. केडीएमसी भ्रष्टाचारासाठी बदनाम आहे असं ही ते यावेळी म्हणाले. गेल्या चाळीस वर्षात 48 अधिकारी पकडले गेले. एकाच दिवशी तीन अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. हेच अधिकारी पुन्हा कामावर रुजू होतील. हा नियम त्या अधिकाऱ्यांसाठी का लागू होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक
स्विमिंग ट्रेनर रविंद्र आवळे हे डोंबिवली एका खाजगी ठिकाणी प्रशिक्षण देत होते. त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात तरुणीने गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला आहे. क्रिडा, स्विमिंग प्रशिक्षण देण्यात आवळे हे उत्तम प्रशिक्षक आहेत. दोन महिन्यापूर्वी एका खाजगी संस्थेत ट्रेनिंग देत असताना त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी स्विमिंग ट्रेनर आवळे यांनी न्यायालयातून अटक पूर्व जामीन मिळविला आहे. डोंबिवलीत मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी डोंबिवली क्रीडा संकुलात असलेल्या तरण तलावात प्रशिक्षण देण्याचे ठरवले.
नक्की वाचा - Kalyan News: स्मार्ट मीटरने दिला वीज बील वाढीचा शॉक, भरमसाठ रकमेमुळे सर्वच हैराण
शिवसैनिकांनी दिला दम
मात्र जुन्या गुन्ह्याच्या कारणास्तव महापालिका अधिकाऱ्यांनी आवळे यांना तरण तलावात प्रशिक्षण देण्यापासून मज्जाव केला. मात्र अनेक मुले घडविणारे आवळे हे तरण तलावाच्या संरक्षक भिंतीबाहेरून उभे राहून मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देत होते. खेळाच्या क्षेत्रात महापालिका अधिकाऱ्यांचे हा प्रताप पाहून शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांना संताप आला. आवळे यांच्या विरोधात एखादा गुन्हा दाखल असू शकतो. मात्र त्याचा तपास पोलिस करतील. त्याचा न्याय निवाडा न्यायालयात होईल. त्याच्यावर असलेले आरोप अद्याप सिद्ध होणे बाकी आहे. त्या आधीच महापालिका अधिकाऱ्यांनी आवळे यांना मज्जाव कसा करतात असा सवाल त्यांनी केला आहे.
मनपा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
राजेश कदम, सुशांत शिंदे,सागर जेधे यांनी प्रकरणी थेट भूमीका घेतली. त्याठिकाणी अधिकारी वर्गास धारेवर धरीत आवळे यांना प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला आहे. तसेच यापूढे त्यांना मज्जाव केल्यास शिवसेना स्टाईलने धडा शिकविला जाईल असा सज्जड इशारा दिला आहे. यासंदर्भारत राजेश कदम यांनी सांगितले की, ही जी मुले आहेत, ती शहराचे भविष्य आहे. या मुलांच्या प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या तरण तलावात त्यांच्या प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या ट्रेनरची कोणी तरी तक्रार केली. जाणीवपूर्व चांगले प्रशिक्षक असलेल्या आवळे यांना कोणी तरी दाबण्यासाठी हा प्रकार केला आहे. या मुलांचे भविष्य खराब करीत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. महापालिका त्यांना त्रास देत होती. त्यांना प्रवेश द्या अशी विनंती केली आहे. मिसाळ नावाच्या मालमत्ता उपायुक्त नको त्या गोष्टीत नाक खुपसतात. ही समज त्यांना मी देतोय असे ही ते म्हणाले. प्रशिक्षक अमित आवळे यांनी सांगितले की, केडीएमसी पूलवर ट्रेनिंगसाठी मनाई केली होती. रोहिनी लोकरे यांनी मला बंदी घातली होती. खोट्या तक्रारीवरुन मला बंदी केली होती असा आरोप त्यांनी केला.