अमजद खान
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत ज्या भागातून भाजपला जास्त मतदान झाले आहे, त्या भागातील मतदारांची बरीशी नावे गाळली गेली आहेत. इतकेच नाही तर केडीएमसी निवडणूकीत मागच्या वेळी ज्या भागातून भाजपचे 42 नगरसेवक निवडून आले होते, त्या प्रभागात भयंकर डाव रचला गेला आहे, असा आरोप भाजपचे निवडूक प्रभारी नरेंद्र सुर्यवंशी केला आहे. ज्यांना भाजपला हरवण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी हे कारस्थान केलं असल्याचं सांगत सुर्यवंशी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना शिंदे गटाकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे कल्याणमधील राजकारण चांगलेच तापले आहे.
भाजपचे निवडणूक प्रभारी नरेंद्र सूर्यवंशी यांनी कोणत्या पक्षाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख शिवसेना शिंद गटाकडे आहे. मात्र यावेळी सूर्यंवशी यांनी सांगितले की, कोणाचा दबाव आहे, त्यांच्यावर आरोप मी करीत नाही. ज्या अधिकाऱ्यांचे काम आहे, त्यांनी निवडणूका पारदर्शक पद्धतीने कशा पार पडतील हे पाहावे. त्यादृष्टीने काम करावे. अन्यथा त्या अधिकाऱ्यांची योग्य ती दखल भाजप घेणार आहे असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना जाहिर झाली आहे. प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. निवडणूक प्रथमच पॅनल पद्धतीने पार पडणार आहे. निवडणूकीसाठी प्रभागाची आरक्षण सोडत पार पडली आहे. आरक्षणाच्या सोडतीवर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्या पाठोपाठ महापालिकेने मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहे. या मतदार याद्या प्रसिद्ध केल्यावर केडीएमसीच्या भाजपच्या माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या प्रभागातील मतदार याद्यात प्रचंड घोळ आढळून आला आहे.
प्रभागाच्या बॉर्डरवरील मतदारांची नावे अन्य प्रभागात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र प्रभागाच्या मध्य भागातील मतदारांची नावे अन्य प्रभागात टाकण्यात आली आहेत. या प्रकरणी भाजपचे प्रभाग अधिकारी सूर्यंवशी यांच्यासोबत माजी उपमहापौर भोईर , पदाधिकारी शक्तीवान भोईर यांनी आज केडीएमसीचे निवडणूक अधिकारी संदीप भूमकर यांची भेट घेतली. प्रभागातील मतदार याद्यातून नावे गायब करण्यात आली असून ती अन्य प्रभागात टाकण्यात आल्याची तक्रार भूमकर यांच्याकडे भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.
भूमकर यांच्या भेटीपश्चात भाजप निवडणूक प्रभारी सूर्यंवशी यांनी सांगितले की, 2015 साली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपचे 42 नगरसेवक निवडून आले होते. मतदार यादीतील नावे गायब करुन ती अन्य प्रभागात टाकण्याचा प्रकार केवळ उपमहापौर भोईर यांच्या प्रभागात झाला नसून मागच्या वेळच्या निवडणूकीत निवडून आलेल्या भाजपच्या 42 नगरसेकांच्या प्रभागात घडला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत ज्या प्रभागातून भाजपला जास्तीचे मतदान झाले होते. त्या प्रभागातील मतदारांची नावे कमी करुन अन्य प्रभागात टाकण्यात आली आहे असा आरोप आहे.