अमजद खान
कल्याण- कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. कल्याणमधील वालधूनी पूल परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा परिमाण संपूर्ण शहरात होतो. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेचे एसीपी किरण बालवडकर यांची भेट घेतली. वाहतूक समस्या त्वरीत दूर करण्याची मागणी त्यांनी केली. ही वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे होत असल्याने यासंदर्भात केडीएमसीला पत्र व्यवहार केला आहे. खड्डे बुजले की, वाहतूक समस्या संपेल असे एसीपी बालवडकर यांनी स्पष्ट केले आहे. या खड्ड्यांचा त्रास वाहतूक पोलीसांनाही होत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
कल्याण पश्चिमेतील वालधूनी पूल परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचा त्रास प्रवासी, वाहन चालकांसह नागरीकांना होतो.या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दर्शन देशमुख यांनी कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी किरण बालवडकर यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देत वाहतूक कोंडीवर योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी,नोकरवर्ग, रुग्णवाहिका तसेच सामान्य माणसांना फटका बसत आहे. साधारणतः एक किलोमीटरच्या प्रवासासाठी दीड तास लागत लागत आहे.
वाहतूक कोंडीवर लवकर तोडगा काढला नाही तर राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दर्शन देशमुख यांनी दिला आहे. एसीपी बालवडकर यांनी सांगितले वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे होत असल्याचे यावेळी सांगितले. शिवाय यासंदर्भात केडीएमसीला पत्र व्यवहार केला आहे. खड्डे बुजले की, वाहतूक समस्या संपेल असं ही ते म्हणाले. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी वाहतूक कोंडीस रस्त्यावरील खड्डे जबाबदार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आत्ता महापालिका रस्त्यावरील खड्डे कधी भरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गणशोत्सवा पूर्वी रस्त्यावरील खड्डे भरले जाणार होते. तसं केडीएमसीने सांगितलं ही होतं. मात्र पावसामुळे खड्डे भरले गेले नाहीत. असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता नवरात्र उत्सवापूर्वी तरी खड्डे भरले जाणे अपेक्षित होते. नवरात्र उत्सवही सुरु झाला आहे. पण रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन दिवाळीची वाट पाहाणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकां प्रमाणे आता खड्ड्यांचा त्रास वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीसांनाही होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुले आता तरी केडीएमसी या रस्त्यांचं काही करेल का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.