अमजद खान, कल्याण
Kalyan News: खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक धक्कादायक प्रकार कल्याणमधून समोर आला आहे. एका ग्राहकाने हॉटेलमधून खाण्यासाठी घेतलेल्या इडलीमध्ये चक्क अळी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार कल्याण पश्चिमेकडील बालाजी डोसा सेंटरमध्ये घडला आहे. ग्राहकाने या गंभीर बाबीची तक्रार केली असता, दुकानदाराने माफी मागण्याऐवजी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पालिकेसह पोलिसांनीही या प्रकरणात तातडीने कारवाई केली आहे.
कल्याण पश्चिममधील बालाजी डोसा सेंटरमधून एका ग्राहकाने इडली खरेदी केली होती. इडली खात असताना त्याला त्यात अळी दिसली, ज्यामुळे तो प्रचंड संतापला. त्याने तत्काळ या प्रकाराची तक्रार दुकानदाराकडे केली. मात्र, दुकानदार लिंगराज लिगे गौडा याने आपली चूक मान्य करण्याऐवजी ग्राहकाला उलट धमकावले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
(नक्की वाचा- Kalyan News : "खड्डेमुक्त रस्ता दाखवा 10 हजारांचं बक्षीस मिळवा", भाजप पदाधिकाऱ्यांचे केडीएमसीला आव्हान)
या प्रकारानंतर ग्राहकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुकानदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानेही तातडीने या दुकानावर कारवाई केली.
(नक्की वाचा- Dadar Kabutar Khana: शस्त्र उचलण्याची भाषा कराल तर याद राखा! गोवर्धन देशमुखांचा जैन मुनींना थेट इशारा)
महापालिकेच्या पथकाने बालाजी डोसा सेंटरची पाहणी करून दुकानातील सर्व खाद्यसामग्री जप्त केली आहे. या घटनेमुळे कल्याणमधील इतर हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्वच्छतेवर आणि गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांबाबत जागरूक राहून तात्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.