अमजद खान, कल्याण
गोमांस असल्याच्या संशयावरून ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान वयोवृद्धला मारहाण केल्याप्रकरणी ठाणे जीआरपी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आकाश आव्हाड, नितेश अहिरे आणि जयेश मोहिते अशी तिघांची नावे आहेत . या तिघांनाही ठाणे रेल्वे पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केले. कोर्टाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्तीच्या हातात दोन बरण्यांमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून काही तरुणांकडून मारहाण केली जात असल्याच्या व्हिडीओत दिसत होतं. ठाणे रेल्वे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. या प्रकरणात रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या आदेशानंतर सदर पीडित व्यक्तीला पोलिसांनी शोधलं.
हाजी अशरफ अली असे या व्यक्तीचे नाव आहे. हाजी अशरफ अली हे मुळचे चाळीसगावचे राहणारे आहेत. 28 ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये राहत असलेल्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणला येत होते. धुळे-मुंबई एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान जागेवर बसण्यावरून त्यांचात काही तरुणासोबत वाद झाला. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेन आल्यानंतर यांच्याकडे बीफ असल्याचे संशयावरून काही तरुणांनी त्यांना मारहाण केली. अशरफ अली यांना कल्याण रेल्वे स्थानकात या तरुणांनी उतरू दिले नाही. नंतर त्यांना ठाणे रेल्वे स्थानकात उतरावे लागले.
ठाणे जीआरपी पोलिसांनी या प्रकरणाचा जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. या प्रकरणात धुळे लोकल क्राईम ब्रांच पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तीन तरुणांना ताब्यात घेतले होते. नंतर या तरुणांना ठाणे जीआरपी पोलीस ठाण्यात आणले गेले. व्हिडिओमध्ये मारहाण करताना जे तरुण दिसत होते हेच ते तरुण होते.
धक्कादायक म्हणजे यांच्यासोबत इतरही तीन तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत .अटक तिघे आरोपी मूळचे धुळे येथे राहणारे आहेत. तिघे 28 ऑगस्ट रोजी पोलीस भरतीसाठी मुंबई येथील घाटकोपरला येत होते. 29 तारखेला त्यांच्या ग्राउंड रिपोर्ट होता. आता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र कायदा हातात घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो या घटनेमुळे एक बाब लक्षात घेतली पाहिजे.