Kalyan News : सकाळी शाळेसाठी निघाल्या अन् घरी आल्याच नाहीत; 4 मुलींच्या अचानक गायब होण्यामागचं सत्य काय?

Kalyan News: कल्याणमधील एका प्रसिद्ध शाळेतील चार अल्पवयीन विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News: एकाच शाळेतील चार मुली एकावेळी बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली होती. (प्रतिकात्मक फोटो)
कल्याण:

Kalyan News: कल्याणमधील एका प्रसिद्ध शाळेतील चार अल्पवयीन विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत जाण्यासाठी घरातून निघालेल्या या चार मुली दुपारपर्यंत घरी न परतल्याने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या 4 तासांत या चौघींचा शोध लावला. घरच्यांना कोणतीही कल्पना न देता या चारही मुली देवदर्शनासाठी थेट राजस्थानमधील अजमेरला निघाल्याचे तपासात समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण परिसरातील एका प्रसिद्ध शाळेत शिकणाऱ्या चार मुली नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. यातील दोन मुली 8 वीच्या वर्गात तर दोन मुली 9 वीच्या वर्गात शिकत आहेत. मात्र, त्या शाळेत पोहोचल्याच नाहीत. बराच वेळ शोध घेऊनही मुलींचा काहीच पत्ता न लागल्याने घाबरलेल्या पालकांनी तातडीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. चार अल्पवयीन मुली एकाच वेळी अचानक बेपत्ता झाल्याने पोलीस प्रशासनातही एकच खळबळ उडाली आणि हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे आणि एसीपी अशोक होनमाने यांनी तातडीने पावले उचलली. मुलींसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी तपासासाठी विशेष 6 पथके तैनात केली. बाजारपेठ पोलिसांनी विविध तांत्रिक माध्यमांचा आणि सीसीटीव्ही फुटेजचा वापर करत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, या चारही मुली कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे गेल्या आणि तिथून त्यांनी अजमेरला जाण्यासाठी अरावली एक्सप्रेस पकडली.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याण हादरले! कर्ज मंजूर झाल्याचे सांगून महिलेला घरात बोलावले, दरवाजा बंद केला आणि पुढे... )

कसा लागला शोध?

मुली अरावली एक्सप्रेसने प्रवास करत असून त्या राजस्थानमधील मारवाड रेल्वे स्थानकावर पोहोचणार असल्याची खात्रीशीर माहिती कल्याण पोलिसांना मिळाली. वेळ न घालवता बाजारपेठ पोलिसांनी तातडीने राजस्थानमधील स्थानिक जीआरपी (GRP) आणि आरपीएफ (RPF) प्रशासनाशी संपर्क साधला.

ट्रेन मारवाड स्थानकावर पोहोचताच तिथल्या रेल्वे पोलिसांनी चारही मुलींना सुखरूप ताब्यात घेतले. कल्याणचे एसीपी अशोक होनमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठ पोलिसांचे पथक या मुलींना आणण्यासाठी रवाना झाले असून त्यांना सुरक्षितपणे कल्याणला परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलींनी कोणालाही न सांगता अजमेरला जाण्याचा निर्णय का घेतला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

( नक्की वाचा : Kalyan News: मलम लावले अन् आजार आणखीच वाढला; KDMC च्या हॉस्पिटलवर रुग्णाचा गंभीर आरोप, प्रकरण काय? )

Topics mentioned in this article