Kalyan School News: कल्याण शहरामध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे, परंतु याच कामामुळे नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार परिसरातील केडीएमसीची मुख्य जलवाहिनी मंगळवारी दुपारच्या सुमारास फुटली. यामुळे संपूर्ण कल्याण पश्चिमेत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बैल बाजार ते गुरुदेव हॉटेलकडे येणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
शाळेला बसला मोठा फटका
हा मुख्य रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना आधीच मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच, या रस्त्यावर असलेल्या कल्याणातील सर्वात मोठ्या आणि नामांकित के.सी. गांधी शाळेला थेट परिणाम सोसावा लागला आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे, त्याच मुख्य मार्गावर ही शाळा आहे आणि त्यात सुमारे 3000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रस्ता बंद असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!))
विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम
विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शाळा प्रशासनाला बुधवारपासून आजपर्यंत सलग 3 दिवस शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शाळा बंद ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तर मोठा परिणाम होतच आहे. त्याशिवाय, सध्या अनेक शाळांमध्ये परीक्षेचा हंगाम सुरू आहे. तसेच शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांवरही परिणाम होत असल्याची माहिती शाळेच्या संचालिका स्वप्नाली रानडे यांनी दिली.
शाळेची प्रशासनाकडे मागणी
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारे हे परिणाम पाहता, शाळा प्रशासनाने संबंधित वाहतूक पोलीस आणि केडीएमसी प्रशासनाकडे लवकरात लवकर हा रस्ता सुरू करण्याची किंवा अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवता येईल.
(नक्की वाचा- लग्नाच्या दिवशीच संसाराचा The End! सासरी निघालेली नवरी वाटेतच झाली गायब)
दुरुस्तीचे काम पूर्ण
या दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीच्या संदर्भात केडीएमसी पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम आज शुक्रवारी पहाटे पूर्ण झाले आहे आणि दुपारपर्यंत त्यावरून वाहतूक सुरू केली जाईल. यामुळे कल्याणकरांना आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.