
Pune Ganeshotsav : गणेशोत्सवाचे वेध आता सर्वांना लागले आहेत. बुद्धीची देवता असलेल्या गणरायाची महाराष्ट्रासह देशभरात या कालावधीमध्ये आराधना केली जाते. फक्त महाराष्ट्रच नाही तर जगभरात पुण्यातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. येथील गणेश मंडळांना मोठा इतिहास आहे. त्याचबरोबर आकर्षक देखाव्यांसाठी देखील पुण्यातील गणेशमंडळ प्रसिद्ध आहेत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी या कालावधीमध्ये जगभरातून भाविक तसंच पर्यटक येत असतात.
पुण्यातील गणपती बाप्पाची मिरवणूक ही विशेष लक्षवेधी असते. या मिरवणुकीत मानाचे पाच गणपती ठरले आहेत. त्यामध्ये कसबा गणपती हा पहिला मानाचा गणपती आहे. तसंच अन्य मानाचे गणपती देखील ठरले आहेत.
पुण्यातील मानाचे पाच गणपती
1) कसबा गणपती
2) तांबडी जोगेश्वरी गणपती
3) गुरुजी तालीम गणपती
4) तुळशीबाग गणपती
5) केसरीवाडा गणपती.
कसबा गणपतीला पहिला मान का?
पुण्यातील गणपती मिरवणुकीत कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती आहे हे सर्वांना माहिती आहे. पण, कसबा गणपतीला हा मान का देण्यात आला हे अनेकांना माहिती नाही. 132 वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. या ऐतिहासिक परंपरेचा अर्थ कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी समजावून सांगितला आहे.
( नक्की वाचा : PM Viksit Bharat Rojgar Yojana : देशभरातील तरुणांना कसे मिळणार 15 हजार? कुठे करणार अर्ज... वाचा सर्व माहिती )
श्रीकांत शेटे यांनी सांगितलं की, पहिला हा क्रमांक आहे. तो व्यवस्थेचा भाग आहे. हा पुण्याची ग्रामदैवता असलेला गणपती आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि ज्या वेळेला मिरवणुकीचा विषय आला , त्यावेळी तेंव्हाचे रे मार्केट म्हणजेच आत्ताचे महात्मा फुले मार्केटमध्ये (मंडई) त्यावेळी या विषयावर चर्चा झाली.
या चर्चेला लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी तत्कालीन ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मिरवणुकीत अग्रक्रम हा ग्रामदैवत असल्यानं कसबा गणपतीला देण्याचं ठरवलं. ग्रामदेवता तांबडी जोश्वरी असल्यानं त्याला दुसरा क्रमांक देण्यात आला. ही परंपरा 132 वर्षांपासून सुरु आहे.
प्रत्येक गणपती हा मानाचा गणपती आहे. मिरवणुकीतील अग्र गणपती हा कसबा गणपती आहे, असं शेटे यांनी स्पष्ट केलं.
शेटे पुढे म्हणाले की, बाळराजे शिवाजी महाराज आणि जिजाऊ पुण्यात आले त्यावेळी त्यांनी या गणपतीची पुर्नस्थापना केली. त्यांनी ग्रामदैवताचा दर्जा दिला आहे. हा गणपती इथं असतो म्हणून पहिला मान कसबा गणपतीला दिला आहे. हा मान ग्रामदैवतेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला मान आहे. त्याच्यावर कुणी शंका उपस्थित करत असेल तर हे खेदजनक आहे. असं शेटे यांनी 'द पोस्टमन' या यूट्यूब चॅनेलच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world