काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी नगरपरिषद निवडणुकीत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. काटोल नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांच्या संयुक्त उमेदवार अर्चना देशमुख यांनी 2376 मताधिक्य मिळवत नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. भाजपचे नेते चरणसिंग ठाकूर यांचे अनेक वर्षांचे वर्चस्व मोडीत काढण्यात देशमुखांची रणनीती यशस्वी ठरली आहे.
काटोलमधील निकाल
- भाजप- 13
- राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी- 12
नगरसेवक पदाच्या शर्यतीत भाजपला 13 जागा मिळाल्या असल्या तरी थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदावर अर्चना देशमुख यांनी बाजी मारल्याने सत्तेच्या चाव्या आता देशमुखांच्या आघाडीकडे आल्या आहेत.
(नक्की वाचा- Amravati Election: चिखलदऱ्यात काँग्रेसचा भाजपला धक्का, शेख अब्दुल शेख हैदर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड)
अनिल देशमुखांची मास्टरस्ट्रोक रणनीती
विजयामागे अनिल देशमुखांनी घेतलेला एक धाडसी निर्णय कारणीभूत ठरला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांनी आपला मुलगा सलील देशमुख याला उमेदवारी दिली होती. मात्र, त्यावेळी शेकापचे राहुल देशमुख रिंगणात असल्याने मतांचे विभाजन झाले आणि भाजपचे चरणसिंग ठाकूर विजयी झाले. ही चूक सुधारण्यासाठी अनिल देशमुख यांनी जुने हेवेदावे बाजूला ठेवून राहुल देशमुख यांच्याशी हातमिळवणी केली.
कुटुंबात नाराजी, पण आघाडीचा विजय
अनिल देशमुखांनी शेकापच्या राहुल देशमुख यांच्या पत्नी अर्चना देशमुख नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने त्यांचे चिरंजीव सलील देशमुख नाराज झाले होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी राहुल देशमुख जबाबदार असल्याचे मानून सलील यांनी या आघाडीला विरोध केला आणि पक्षाचा राजीनामा दिला होता. मात्र, अनिल देशमुखांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर ही आघाडी कायम ठेवली आणि अखेर भाजपला पराभूत करण्यात यश मिळवले.
(नक्की वाचा- Dhule Nagarparishad Election: पिंपळनेरमध्ये शिंदेंच्या आमदाराला धक्का, सत्तेच्या चाव्या आता भाजपकडे!)
चरणसिंग ठाकूर यांचे काटोल नगरपरिषदेवर अनेक वर्षांपासून वर्चस्व होते. अनिल देशमुख आमदार असतानाही ठाकूर यांची पकड ढिली झाली नव्हती. मात्र, आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शेकापच्या या युतीने भाजपला सत्तेबाहेर फेकले आहे. या विजयामुळे आगामी काळात काटोलमधील भाजपच्या ताकदीला मोठी खीळ बसण्याची शक्यता आहे.