Dombivli News: 100 कुटुंबांचा संसार उघड्यावर येणार? KDMC च्या एका चुकीच्या निर्णयामुळे डोंबिवलीत संतापाची लाट

Dombivli News: डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून केडीएमसीच्या कारभारातील एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dombivli News: या गोंधळामुळे आता दोन मोठ्या इमारतींमधील सुमारे 100 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.
डोंबिवली:

Dombivli News: डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून केडीएमसीच्या कारभारातील एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका इमारतीची तक्रार असताना दुसऱ्याच इमारतीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका प्रशासनाच्या भूमिकेमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. या गोंधळामुळे आता दोन मोठ्या इमारतींमधील सुमारे 100 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आली असून, तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्त इंदूराणी जाखड आणि तत्कालीन सहाय्यक आयुक्त संजय कुमावत हे सध्या या प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयरे गावातील टावरी पाडा येथील मल्हार हाईटस या इमारतीबाबत तक्रार करण्यात आली होती. 

मात्र, प्रशासनाने शहानिशा न करता मल्हार हाईटसऐवजी समर्थ हाईटस या दुसऱ्याच इमारतीवर कारवाई करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि फौजफाटा पाठविला होता. तक्रार एका इमारतीची असताना दुसऱ्याच इमारतीला लक्ष्य का केले गेले, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांनी हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला, याचा खुलासा होणे आता गरजेचे बनले आहे.

( नक्की वाचा : Dombivli News धक्कादायक! डोंबिवलीतील 'त्या' अग्नीकांडाचा व्हिलन इमारतीतलाच तरुण; पार्किंगमध्ये नक्की काय घडलं? )

मल्हार आणि समर्थ हाईटसवर कारवाईचा बडगा

सध्याचे सहाय्यक आयुक्त भरत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील मल्हार हाईटस ही इमारत अनधिकृत घोषित करण्यात आली आहे. या इमारतीचे जागा मालक बाळाराम केणे (जे आता हयात नाहीत) तसेच करारनामा धारक निलेश पाटील, निलेश केणे आणि पवन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, या इमारतीमधील 40 कुटुंबांना आता घर खाली करावे लागणार आहे. भावकीतील वादामुळे बबन केणे यांनी या इमारतीविरोधात तक्रार केली होती, परंतु प्रशासकीय गोंधळामुळे या वादात तिसरीच इमारत भरडली गेली.

( नक्की वाचा : Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिकेचा आणखी एक घोटाळा, जेलमध्ये हवा खाणाऱ्या कर्मचाऱ्याला 40 दिवस पगार )

100 कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर

प्रशासकीय दिरंगाई आणि चुकीच्या निर्णयांचा फटका आता सामान्य नागरिकांना बसत आहे. आधी समर्थ हाईटसवर कारवाईचा प्रयत्न झाला, जिथे नागरिकांनी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ती कारवाई थांबली होती. मात्र आता महापालिकेने आक्रमक पवित्रा घेत मल्हार हाईटस आणि समर्थ हाईटस या दोन्ही इमारतींवर कारवाई प्रस्तावित केली आहे. 

Advertisement

या दोन्ही इमारतींमध्ये मिळून एकूण 100 कुटुंबे वास्तव्यास आहेत. जर ही पाडकाम कारवाई झाली, तर या शेकडो लोकांचे संसार उघड्यावर येण्याची भीती व्यक्त होत आहे.

'तो' प्रश्न अनुत्तरितच

तक्रार मल्हार हाईटसची असताना समर्थ हाईटसवर फौजफाटा का पाठवला गेला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. इंदूराणी जाखड आणि संजय कुमावत यांच्या या संशयास्पद कार्यपद्धतीमुळे पालिकेच्या प्रतिमेला तडा गेला आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की केवळ इमारतीमधील रहिवाशांनाच शिक्षा भोगावी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Advertisement

सहाय्यक आयुक्त भरतकुमार पवार यांनी आता दोन्ही इमारतींवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याने येत्या काळात डोंबिवलीत तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.