KDMC News: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असतानाच आता या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केडीएमसीच्या महासभेत या विषयावरून भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. संबंधित कंत्राटदार संस्थेला मुदतवाढ दिलेली नसतानाही पालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपये लाटले गेल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण?
भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ज्या संस्थेला कंत्राट देण्यात आले होते, त्या संस्थेने नियमांची पायमल्ली केल्याचे दीपेश म्हात्रे यांनी निदर्शनास आणून दिले. या संस्थेची मुदत संपलेली असतानाही कोणतीही अधिकृत मुदतवाढ न घेता पुढील 3 महिने काम सुरू ठेवले गेले. या कालावधीत कामाच्या बदल्यात जवळपास 30 लाख रुपये पालिकेकडून वसूल करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, या संस्थेशी संबंधित एका डॉक्टरने महापालिका आणि संबंधित संस्था अशा दोन्ही ठिकाणाहून एकाच वेळी पगार घेतल्याचेही या चर्चेदरम्यान उघड झाले. यामुळे प्रशासकीय स्तरावर एकच खळबळ उडाली आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये ठाकरे गटाचा 'सेल्फ गोल'? नगरसेवकाच्या हकालपट्टीवरून पक्षातच संभ्रम! )
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने दोन बळी
कल्याण डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्याचा फटका निष्पाप नागरिकांना बसत आहे. या वर्षात आतापर्यंत तब्बल 18,000 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या भीषण परिस्थितीमुळे आतापर्यंत दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.
यामध्ये एका 7 वर्षीय चिमुरड्याचा समावेश असून, दुसऱ्या एका तरुणानं आपल्याला कुत्र्याने चावा घेतला आहे आणि आता रेबीज होईल, या भीतीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. अशा दुर्दैवी घटनांमुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
( नक्की वाचा : Jitendra Awhad :'महाराजांना पायानं टिळा लावला...', आव्हाडांच्या वक्तव्यानं विधानसभा पेटली; वाचा नेमकं काय घडलं )
महासभेत दीड तास वादळी चर्चा
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर महासभेत जवळपास दीड तास सविस्तर चर्चा झाली. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असताना प्रशासन मात्र कंत्राटदारांच्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. वारंवार मागणी करूनही कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. केवळ कागदावर निर्बीजीकरण दाखवून निधी लाटला जात असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला.
आयुक्तांकडून चौकशीचे आदेश
या गंभीर आरोपांची दखल घेत महापौर हर्षाली चौधरी यांनी पालिका आयुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्त अभिनव गोयल यांनी या संदर्भात चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मुदतवाढ नसताना पैसे कसे दिले गेले आणि दुहेरी पगार घेणाऱ्या डॉक्टरांचे नेमके प्रकरण काय आहे, याचा अहवाल आता सादर करावा लागणार आहे. या चौकशीनंतर भ्रष्ट कंत्राटदारावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.