KDMC Election : कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात मतदार यादीतील मोठा गोंधळ झाल्याचा आरोप होत आहे. अनेक मतदारांची नावे समाविष्ट आहेत, पण त्यांनी दिलेल्या पत्त्यावरच्या चाळीच अस्तित्वात नाहीत, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे, तर ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच पंचायत समितीमधील मतदारांची नावेही केडीएमसीच्या यादीत आढळली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) यावर जोरदार हरकत घेत सुमारे 33,000 बोगस नावे वगळण्याची मागणी केली आहे.
अस्तित्वात नसलेल्या पत्त्यावर 1,400 मतदार
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काटई गावात तब्बल 1,400 मतदारांची नावे दुबार (duplicate) असल्याचं मनसेच्या तपासणीत समोर आलं. जेव्हा या मतदारांचा पत्ता तपासण्यात आला, तेव्हा या मतदारांनी उल्लेख केलेल्या चाळी किंवा वस्त्या त्या ठिकाणी अस्तित्वातच नसल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे, हे सर्व मतदार ठाणे महापालिकेच्या हद्दीत राहणारे आहेत, पण त्यांची नावे काटईसारख्या कल्याण ग्रामीणमधील गावात टाकण्यात आली आहेत.
( नक्की वाचा : Mumbai Local : मुंबईकरांसाठी 'अच्छे दिन'! बदलापूर-कर्जत मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन, रोजचा त्रास होणार कमी )
ठाणे, नवी मुंबईचे मतदार केडीएमसीच्या यादीत
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) मतदार यादीत केवळ दुबार नावेच नव्हे, तर नवी मुंबई, ठाणे आणि पंचायत समितीच्या पाच गावांतील मतदारांची नावेही आढळून आली आहेत. हा सर्व गोंधळ पाहता, मनसेकडून केडीएमसीच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी अरुण जांबळे, योगेश पाटील, आणि प्रभाकर जाधव यांनी महापालिकेच्या निवडणूक उपायुक्तांकडे मतदार यादीतील या घोळावर आक्षेप घेत रीतसर हरकत नोंदवली आहे. राहुल कामत यांनी सांगितले की, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सुमारे 33,000 दुबार मतदारांची नावे आहेत. ही सर्व नावे वगळण्यात यावीत, यासाठी मनसेने यापूर्वीच कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडेही लेखी तक्रार केली होती.
( नक्की वाचा : Share Market Scam मुंबईत 35 कोटींचा 'शेअर घोटाळा'! 72 वर्षांच्या उद्योजकाला 4 वर्ष फसवले, वाचा नेमकं काय घडलं? )
या धक्कादायक प्रकाराची निवडणूक उपायुक्तांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. यापूर्वी, मतदार यादीतील गोंधळाविरोधात मनसेने समविचारी पक्षांना सोबत घेऊन मुंबईत मोर्चा काढला होता. त्यावेळी सत्ताधारी पक्षांनी मनसेवर टीका केली होती. मात्र, आता अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीत खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मतदार यादीतील या घोळावर जोरदार हरकत घेतली आहे. त्यामुळे, मतदार यादीतील या मोठ्या त्रुटी आणि गोंधळासाठी निवडणूक आयोगच (Election Commission) जबाबदार असल्याचं मत राहुल कामत यांनी व्यक्त केलं आहे.