Share Market Scam Mumbai : मुंबईतील एका ज्येष्ठ उद्योजकासोबत 35 कोटी रुपये किमतीचा मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. माटुंगा वेस्ट येथे राहणाऱ्या ७२ वर्षीय भरत हरकचंद शहा यांनी गोरेगाव (पूर्व) येथील ग्लोब कॅपिटल मार्केट लिमिटेड या ब्रोकरेज कंपनीवर विश्वासघात करून सुमारे 35 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या प्रतिनिधींनी शहा यांचा विश्वास संपादन केला. 'सुरक्षित ट्रेडिंग'चे आमिष दाखवून त्यांनी शहा आणि त्यांच्या पत्नीच्या डिमॅट खात्यावर गेली चार वर्षे त्यांच्या परवानगीशिवाय कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले. इतकेच नाही, तर OTP (One Time Password) आणि ईमेलचा संपूर्ण ॲक्सेस या कंपनीच्या प्रतिनिधींकडे होता आणि शहा यांना या संपूर्ण प्रकाराचा कोणताही सुगावा लागला नाही.
कोण आहेत भरत शहा?
भरत शहा हे माटुंगा वेस्ट येथे गेली सुमारे तीन दशके वास्तव्यास आहेत. ते परळ येथे गेली पाच दशके एक गेस्ट हाऊस चालवत आहेत, जिथे कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कमी भाड्यामध्ये राहण्याची सोय मिळते. 1984 मध्ये वडिलांचे निधन झाल्यावर शहा आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर मोठ्या प्रमाणात शेअर्स हस्तांतरित झाले होते. मात्र, दोघांनाही शेअर बाजाराची फारशी माहिती नसल्यामुळे त्यांनी कधीही सक्रिय ट्रेडिंग केले नव्हते.
( नक्की वाचा : GPS उभे आहात की झोपलेले, कसं आहे तुमचं घर? प्रत्येक क्षण होतोय रेकॉर्ड; डिजिटल पाळत थांबवण्यासाठी करा हे उपाय )
2020 मध्ये खाते उघडले आणि...
शहा यांनी 2020 मध्ये एका मित्राच्या सल्ल्यानुसार, ग्लोब कॅपिटल मार्केट लिमिटेडमध्ये स्वतःचे आणि पत्नीचे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडले. त्यांचे वडिलोपार्जित शेअर्स याच कंपनीत हस्तांतरित करण्यात आले. सुरुवातीला सर्व व्यवहार सामान्य होते.
मात्र, काही काळानंतर कंपनीचे प्रतिनिधी सातत्याने त्यांच्या संपर्कात येऊ लागले. त्यांनी शहांना 'ट्रेडिंगसाठी वेगळे पैसे गुंतवण्याची गरज नाही, शेअर्स ठेवून सुरक्षितपणे ट्रेड करता येईल आणि नियमित नफा मिळेल' असे आश्वासन दिले. यासाठी कंपनीकडून 'पर्सनल गाईड' दिले जातील, असे सांगण्यात आले. याच बहाण्याने अक्षय बारीया आणि करण सिरोया या दोन प्रतिनिधींना शहा यांचा पोर्टफोलिओ 'सांभाळण्यासाठी' नेमण्यात आले.
( नक्की वाचा : Dombivli News : किरकोळ वादातून संसार उद्ध्वस्त, डोंबिवलीत पतीने पत्नीला संपवले; 3 मुलं पोरकी )
OTP आणि ईमेलसह सर्व नियंत्रण कंपनीच्या हातात
एफआयआरनुसार, हे दोन्ही प्रतिनिधी शहांना दररोज फोन करून कोणती ऑर्डर करायची आहे, याची माहिती देत असत. काही काळानंतर कंपनीचे कर्मचारी त्यांच्या घरी येऊन लॅपटॉपवरून ईमेल पाठवू लागले. हळूहळू परिस्थिती अशी झाली की, प्रत्येक OTP तेच टाकत असत आणि प्रत्येक SMS व ईमेल तेच उघडून उत्तरे देत असत. शहांना केवळ आवश्यक तेवढीच आणि कंपनीच्या फायद्याची माहिती दिली जात होती. अशाप्रकारे, त्यांच्या खात्याचा संपूर्ण ताबा कंपनीने घेतला.
4 वर्षे ट्रेडिंग सुरू, कागदोपत्री नफा
मार्च 2020 ते जून 2024 या 4 वर्षांच्या काळात शहांना कंपनीकडून मिळणाऱ्या स्टेटमेंटमध्ये सगळे काही व्यवस्थित दाखवले जात होते. स्टेटमेंटमध्ये नफा (Profit) दिसत असल्याने, पडद्याआड काही वेगळेच सुरू आहे, याचा शहांना कधीही संशय आला नाही.
मात्र, जुलै 2024 मध्ये शहांना ग्लोब कॅपिटलच्या रिस्क मॅनेजमेंट विभागातून कॉल आला. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात 35 कोटी रुपयांचे डेबिट बॅलन्स असून, ते त्वरित भरावे लागतील, अन्यथा शेअर्स विकले जातील, असे त्यांना सांगण्यात आले.
कंपनीमध्ये जाऊन तपास केला असता, धक्कादायक बाब समोर आली. त्यांच्या खात्यातून सातत्याने मोठी ट्रेडिंग करण्यात आली होती, कोट्यवधी रुपयांचे शेअर्स विकले गेले होते आणि अनेक वेळा एकाच पार्टीसोबत खरेदी-विक्री (Circular Trades) झाली होती. अशाप्रकारे, त्यांच्या खात्याला हळूहळू तोट्यात ढकलले गेले होते.
( नक्की वाचा : Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच )
कशी उघड झाली फसवणूक?
शहा यांनी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेऊन स्वतः मार्केटमध्ये आपले शेअर्स विकले आणि 35 कोटी रुपये भरले. त्यानंतर त्यांनी उर्वरित शेअर्स दुसऱ्या कंपनीत हस्तांतरित केले. याच दरम्यान, त्यांनी ग्लोबच्या वेबसाइटवरून मूळ स्टेटमेंट डाऊनलोड करून जुन्या ईमेलमधील स्टेटमेंटशी जुळवून पाहिले असता, अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या.
दोन्ही स्टेटमेंटमध्ये मोठे अंतर होते. तसेच, कंपनीला NSE कडून अनेक नोटिसा मिळाल्या होत्या. या नोटिसांची उत्तरे कंपनीने शहा यांच्या नावाने पाठवली होती, पण शहांना कोणत्याही नोटीसची माहिती नव्हती. मूळ ट्रेडिंग हिस्ट्री आणि त्यांना ईमेलमध्ये दाखवलेला डेटा यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक होता.
एफआयआर दाखल, EOW कडून तपास सुरू
कंपनीने 4 वर्षे आपल्याला खोटी आर्थिक स्थिती दाखवली आणि तोटा वाढत राहिला, असा दावा भरत शहा यांनी केला आहे. अखेरीस, त्यांनी एफआयआर (FIR) दाखल केली आहे. वनराई पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी (IPC) च्या कलम 409, 420, 465, 467, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भरत शहा यांनी ही संपूर्ण घटना संघटित आर्थिक फसवणूक असल्याचे सांगत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world