जाहिरात

KDMC : कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंसह शिंदेचीही घेतली भाजपानं विकेट, बडा नेता करणार पक्षप्रवेश, महापौरपदावरही दावा?

KDMC Election : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण राजकीय खेळी खेळली आहे.

KDMC : कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंसह शिंदेचीही घेतली भाजपानं विकेट, बडा नेता करणार पक्षप्रवेश, महापौरपदावरही दावा?
KDMC Election : हा पक्षप्रवेश ठाकरेंसोबत शिंदे गटालाही धक्का मानला जातोय.
डोंबिवली:

KDMC Election : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण राजकीय खेळी खेळली आहे. या खेळीमुळे शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला असून, महापालिका क्षेत्रातील पक्षाचा एक मातब्बर आणि प्रमुख चेहरा आता थेट भाजपच्या गोटात सामील होत आहे.

कोण करणार प्रवेश?

कल्याण-डोंबिवलीतील ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा राजकीय हादरा मानला जात आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे त्यांच्यासोबत 7 ते 8 माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश उद्या, म्हणजेच रविवार ( 9 नोव्हेंबर 2025) रोजी डोंबिवली जिमखाना (Dombivli Gymkhana) येथे आयोजित करण्यात आला आहे.

( नक्की वाचा : KDMC Election: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवली महापालिकेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध, कुठे पाहता येणार? )
 

 भाजपचे दिग्गज नेते राहणार उपस्थित

या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे (BJP) अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत, जे पक्षाची ताकद दाखवून देतील. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा समावेश आहे. KDMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली तयारी अधिक वेगवान केली असून, पक्षाचे लक्ष्य स्पष्ट आहे: केडीएमसीमध्ये भाजपचा महापौर बसवणे. म्हात्रे यांच्यासारख्या मोठ्या चेहऱ्याचा प्रवेश याच मोठ्या लक्ष्याचा एक भाग आहे.

 कोण आहेत दीपेश म्हात्रे?

दीपेश म्हात्रे हे कल्याण-डोंबिवलीतील एक मातब्बर आणि जुने नगरसेवक म्हणून ओळखले जातात. ते 2009 पासून नगरसेवक आहेत. त्यांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची जबाबदारी 2 वेळा यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांच्या कुटुंबाचाही महापालिकेच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. त्यांचे वडील पुंडलिक म्हात्रे यांनी महापौरपद भूषवले आहे, तर त्यांची आई आणि बंधू देखील नगरसेवक होते. अशा मोठ्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या चेहऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश हा ठाकरे गटासाठी खूप मोठा धक्का आहे. म्हात्रे हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती, पण ते भाजपामध्ये प्रवेश करणाार आहेत. त्यामुळे हा शिंदे गटासाठीही धक्का मानला जातोय. 

( नक्की वाचा : Pune Land Scam : 'हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलंय...' पार्थ पवार प्रकरणातील आरोपीवर शरद पवारांची गूढ प्रतिक्रिया )
 

पुढील राजकीय समीकरणे काय?

दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपकडून आणखी काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता असून, भाजप आपली सर्व ताकद KDMC च्या महापौरपदावर केंद्रित करत आहे. आता या धक्क्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी कोणती पाऊले उचलणार? सध्या सत्तेत असलेला शिवसेना (शिंदे गट) याला काय प्रत्युत्तर देणार? मनसे नेते राजू पाटील यांची या राजकीय घडामोडींवर काय प्रतिक्रिया असणार? हे पाहणे केडीएमसीच्या पुढील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com