अमजद खान, प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली (KDMC) महापालिकेच्या परिसरात दोन मोेठी महापालिका हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलची परिस्थिती जगजाहीर आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तरीही या हॉस्पिटलमधील डॉक्टर सुधारण्याचे नाव घेत नाही. मनसेच्या पाहणी दरम्यान अशी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पाहून मुख्य आरोग्य अधिकारी सुद्धा आवाक झाले. हॉस्पिटलमधील प्रेझेंटी मस्टरवर एका डॉक्टरांची 20 एप्रिल पर्यंत हजर असल्याची सही आधीच करण्यात आली आहे. एमबीबीएस असलेल्या या डॉक्टरचे नाव राज रतन असे आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 20 लाखाची लोकसंख्या आहे. या नागरिकांकरिता महापालिकेची दोन हॉस्पिटल आहे. कल्याणमध्ये रुक्मीणीबाई तर डोंबिवलीत शास्त्रीनगर हॉस्पिटल आहे. काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एका गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. चौकशी आणि तपासाअंती ही महिला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूमुखी झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात दोन डॉक्टरांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास सुरु आहे.
चार दिवसापूर्वी महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात एका महिलेचा मृत्यू झाला. त्याचा तपास आणि चौकशी सध्या सुरु आहे. या हॉस्पिटलमध्ये काय चालले आहे याचा जाब विचारण्यासाठी मनसे पदाधिकारी दिपीका पेंडणेकर, प्रकाश भोईर, सुदेश चुडनाईक, कोमल पाटील अरुण जांभळे यांच्या उपस्थितीत मुख्य अधिकाऱ्यास जाब विचारला. वारंवार रुग्णांना असुविधा का होते ? हे सगळे सुरु असताना हॉस्पिटलमध्ये डॉक्टर किती उपस्थित राहतात. यासाठी डॉक्टरांचे प्रेझेंटी मस्टर चेक केले गेले. ते पाहताच मनसे पदाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल हे आवाक झाले.
( नक्की वाचा : Kalyan : बदलापूर प्रकरणाची कल्याणमध्ये पुनरावृत्ती ! आश्रमशाळेत मुलींवर अत्याचार, तर मुलांना.... )
एका डॉक्टरने 15 एप्रिल रोजी 20 एप्रिलपर्यंत प्रेझेंटी आधीच लावून ठेवली होती. हे पाहून सगळेच हैराण झाले. डॉक्टर रुग्णलयात उपस्थित न राहता त्याची उपस्थिती लागते. तर रुग्णावर उपचार कोण करणार? आणि आरोग्य सेवा कशी मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
या प्रकरणी संबंधित डॉक्टरला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. ही बाब गंभीर आहे. चौकशी करुन त्याच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिलं आहे.