अमजद खान
मान्सूनचं आगमन झालं आहे. मुंबई आणि उपनगरात ही चांगला पाऊस झाला आहे. कल्याण डोंबिवलीत ही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पण कल्याण डोंबिवलीत झालेल्या एक तासाच्या पावसाने मात्र महापालिकेच्या पावसाळ्या पूर्वी केलेल्या नाले सफाईची पोलखोल केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होती. प्रत्यक्षात केवळ एक तासाच्या पावसात शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. घरा-घरात पाणी साचल्याचं चित्र होतं. तर काही ठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे पालिकेच्या दाव्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
याच मुद्द्यावर सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा गाजली. महासभेत शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांच्या घरात पाणी शिरलं तर आम्ही अधिकाऱ्यांना बसू देणार नाही असा इशारा यावेळीकुणाल पाटील यांनी दिला. गेल्या तीन दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत अधूनमधून पाऊस पडत आहे. कमी पावसातच अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पाणी साचल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
नक्की वाचा - Siya Goyal: सोनम सुटली! सिया गोयल ही जामीनावर सुटणार? कोर्टाच्या 'त्या' निकालाने खळबळ
कल्याण पश्चिमेतील नवनाथ नगरसह विविध परिसरांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महासभेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील म्हणाले, "फक्त एक तासाच्या पावसात माझ्या प्रभागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. नालेसफाईबाबत मी वारंवार महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वी शहर अभियंता अनिता परदेशी यांनीही माझ्या प्रभागाची पाहणी केली होती. त्यावेळी अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली दिसत नाही." त्याचा फटका मात्र नागरिकांना बसला आहे.
कल्याण ग्रामीणमधील 27 गावांमध्ये विकासकामे होत नाहीत. या गावांसाठी महानगरपालिकेने निधी दिला आहे की नाही? जाणूनबुजून 27 गावांतील नागरिकांवर अन्याय का केला जात आहे?" असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाकडे उपस्थित केला. महासभेदरम्यान या प्रश्नांवर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला. भविष्यातही पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. अल्प पावसातच अनेक भाग जलमय झाल्याने केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यांवर नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world