KDMC Politics News : कल्याण डोंबिवली महापालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधारी युतीमधील दोन प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपा यांच्यात आता एका महत्त्वाच्या पदावरून संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदावर भाजपाने आपला दावा ठोकला असून, यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झाला आहे.
सत्तेचे समीकरण आणि भाजपाचा पवित्रा
महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाली आहे. सध्या महापौर पद शिवसेना शिंदे गटाकडे आहे, तर उपमहापौर पद भाजपाकडे आहे. मात्र, आता भाजपाने स्थायी समिती सभापती पद आणि सभागृह नेते पदासाठी जोरदार आग्रह धरला आहे. भाजपा गटनेत्यांच्या उपस्थितीत नुकताच एक ठराव मंजूर करण्यात आला असून, हे पद भाजपलाच मिळावे अशी मागणी सर्व नगरसेवकांनी लावून धरली आहे. 16 मार्च रोजी होणाऱ्या महासभेत या विषयावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महासभेचे आयोजन आणि समित्यांची निवड
गेल्या अनेक दिवसांपासून महासभा घेतली जात नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप आक्रमक झाले होते. अखेर पालिका प्रशासनाने 16 मार्च रोजी महासभा घेण्याचे जाहीर केले आहे. या महासभेत महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे.
ही सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहीर केली जाईल. भाजपाला आता या महत्त्वाच्या समितीवर आपले वर्चस्व निर्माण करायचे आहे.
( नक्की वाचा : Pune News पुण्यात नव्या उड्डाणपुलावरच वाहनांच्या रांगा; फडणवीसांनी लोकार्पण केलेला 'तो' पूल का ठरतोय डोकेदुखी? )
नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी याविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे. महायुतीच्या वाटाघाटीमध्ये भाजपला हे पद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे गटनेते विश्वनाथ राणे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने मागणी केली असली तरी, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून यावर सामंजस्याने निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले आहे. सत्तेत एकत्र असले तरी या महत्त्वाच्या पदावरून दोन्ही पक्षांमध्ये पडद्यामागे मोठे राजकारण रंगताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world