Ketan Agarwal : केतनच्या हत्येनंतर सियाने काय लपवले? पोलिसांच्या हाती लागलेल्या नव्या धाग्यामुळे गूढ वाढले

Ketan Agarwal murder case: पुण्याजवळच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ketan Agarwal murder case: या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.
पुणे:

Ketan Agarwal murder case: पुण्याजवळच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतनचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मोबाईल फोन काही काळ त्याची होणारी पत्नी म्हणजेच मुख्य आरोपी सिया गोयल हिच्याकडेच होता, असा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. या नव्या माहितीमुळे आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले असून, या काळात सियाने मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे नष्ट केले का, या दृष्टीने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. त्यामुळे केतनच्या हत्येचे गूढ अधिकच वाढले आहे.

सियाने फोन स्वतःकडे का ठेवला होता?

केतन अग्रवालच्या हत्येनंतर त्याचा फोन सियाकडेच राहिला होता आणि काही काळानंतर तिने तो केतनच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनला दरीत ढकलून दिल्याचे समोर आले आहे. 

Advertisement

मात्र, हत्येनंतर सियाने तो फोन स्वतःकडे का ठेवला होता आणि त्या फोनमधील डेटा किंवा चॅट्स डिलीट करण्यात आले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या काळात सिया आणि चेतनने मिळून केतनच्या फोनमधील काही महत्त्वाचे पुरावे किंवा दोघांमधील संभाषण मिटवण्याचा प्रयत्न केला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

( नक्की वाचा : Lohagad Fort: लोहगडावरील 'सिया पॉईंट'पाहण्यासाठी देशभरातून गर्दी; 2000 वर्षांच्या इतिहासाला अनपेक्षित वळण )

भव्य लग्नाची तयारी आणि संशयाची ठिणगी

केतन आणि सिया यांचा साखरपुडा याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबांनी जयपूरमधील एक राजवाडा करून बुक केला होता. मात्र, या भव्य तयारीच्या मागे एक वेगळेच नाट्य सुरू होते. केतनला सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील प्रेमसंबंधांबद्दल संशय आला होता. 

केतनने त्याच्या कुटुंबीयांना सियाची पार्श्वभूमी तपासून पाहण्यास सांगितले होते, तसेच सिया वारंवार चेतनचे नाव घेत असल्याबद्दल केतनने त्याचे वडील विशाल यांच्याकडे चिंताही व्यक्त केली होती.

( नक्की वाचा : Siya Goyal: सिया आणि केतनच्या कारमध्ये काय घडलं? ड्रायव्हरने पाहिलेला तो सीन सियाला जेलमध्ये सडवणार! )
 

गुन्ह्याचे प्रात्यक्षिक आणि पोलिसांचा वैज्ञानिक तपास

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी रविवारी सियाला सोबत घेऊन लोहगड किल्ल्यावर गुन्ह्याचे प्रात्यक्षिक केले होते. यावेळी एका डमी पुतळ्याला दरीत ढकलून संपूर्ण घटनेची पुनर्रचना करण्यात आली. त्यानंतर आज (बुधवार 1 जुलै 2026) पोलिसांनी दुसरा आरोपी चेतन चौधरी यालाही घटनास्थळी नेऊन हत्येच्या वेळचा नेमका घटनाक्रम कसा होता, याचे प्रात्यक्षिक करून घेतले आहे. सध्या हे दोघेही आरोपी 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

Advertisement

चेतनचा चालण्याचा पॅटर्न तपासणार

या गुन्ह्यामध्ये चेतनचा सहभाग सिद्ध करण्यासाठी पोलीस आता गेट अ‍ॅनालिसिस म्हणजेच व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीचा वैज्ञानिक अभ्यास करणार आहेत. ट्रेकदरम्यान केतन आणि सियाचा पाठलाग करणारी व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ती व्यक्ती चेतन नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे. हा दावा खोडून काढण्यासाठी पोलीस आता चेतनला चालवून त्याचे प्रात्यक्षिक रेकॉर्ड करणार आहेत, जेणेकरून सीसीटीव्हीमधील व्यक्ती चेतनच आहे हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता येईल. या तांत्रिक तपासामुळे सिया आणि चेतनच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.