Ketan Agrawal Murder Case: पुण्याजवळच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल या तरुणाच्या हत्येप्रकरणी रोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला तिच्या भावाने कारमध्ये जबरदस्तीने बसवले होते, असा खळबळजनक दावा त्यांना पुण्याहून मुंबई विमानतळावर सोडणाऱ्या कॅब ड्रायव्हरने केला आहे. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते आणि तिनेच नियोजनबद्ध पद्धतीने केतनचा पासपोर्ट चोरून त्यांची बाली वारी रद्द केली होती, असे आता पोलिस तपासात समोर आले आहे.
कॅब ड्रायव्हरचा मोठा दावा
पुण्याहून मुंबई विमानतळाचा प्रवास घडवून आणणाऱ्या वैभव जाधव या कॅब ड्रायव्हरने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सिया गोयल ही या प्रवासादरम्यान अत्यंत नाराज होती. तिची कारमध्ये बसण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिचा भाऊ साहिल याने तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले होते.
पुणे ते रावेत दरम्यानच्या प्रवासात सिया आणि तिच्या भावामध्ये जोरदार भांडणही झाले होते. यानंतर किवळे येथील लोढा परिसरातून केतन अग्रवाल आणि त्याचे कुटुंबीय या कारमध्ये आले आणि सर्वजण मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले.
( नक्की वाचा : Ketan Agarwal Murder: केतन अग्रवालच्या हत्येचा रश्मिकाच्या सिनेमाशी संबंध काय? सोशल मीडियावर पेटलाय नवा वाद )
खालापूर फूड मॉलवरील ती संशयास्पद हालचाल
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर फूड कोर्टजवळ चहा-नाश्त्यासाठी ही कार थांबली होती. केतनच्या वडिलांनी आणि ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण गाडीबाहेर असताना सिया मोबाईल विसरल्याचे सांगून पुन्हा कारजवळ आली. तिने कारमधून काही वस्तू काढून आपल्या खिशात ठेवल्याचे ड्रायव्हरने पाहिले होते.

विमानतळावर पोहोचल्यावर सर्वांचे पासपोर्ट तपासले गेले, तेव्हा फक्त केतनचाच पासपोर्ट गायब असल्याचे समोर आले. सर्व कागदपत्रे आणि पासपोर्ट एकाच पाऊचमध्ये असताना केवळ केतनचाच पासपोर्ट गहाळ झाल्याने केतनच्या वडिलांनी सुरुवातीलाच घातपाताचा संशय व्यक्त केला होता. पासपोर्ट न मिळाल्याने केतनला विमानतळावरूनच मागे फिरावे लागले आणि त्यांची बाली येथील प्री-वेडिंग शूटची ट्रिप रद्द झाली.
( नक्की वाचा : महाल बुकींग आणि प्रायव्हेट जेटची चर्चा विसरा, पुण्याच्या केतन अग्रवाल हत्याकांडात सियाने टाकला नवा डाव )
महिला स्वच्छतागृहात फेकला पासपोर्ट
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने अत्यंत हुशारीने केतनचा पासपोर्ट चोरला होता. खालापूर फूड मॉल येथे कारमधून पासपोर्ट चोरल्यानंतर तिने तो तिथल्याच महिला स्वच्छतागृहात फेकून दिला होता. प्री-वेडिंग शूट रद्द करण्यासाठीच तिने हे कृत्य केले होते. पोलीस आता हा पासपोर्ट शोधण्यासाठी खालापूर फूड मॉल येथे एक पथक पाठवणार आहेत.
6 महिन्यांत 2400 हून अधिक कॉल्स
केतन अग्रवालचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरील 400 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, पण पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांनी सांगितले की, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे गेल्या एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. लग्न ठरल्यानंतरही त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते.
गेल्या 6 महिन्यांत या दोघांमध्ये तब्बल 2004 वेळा फोनवर बोलणे झाले होते. त्यांनी एकमेकांशी तब्बल 238 तास संवाद साधला असून काही कॉल्स तर 2 ते 3 तासांपेक्षा जास्त वेळ होते.
( नक्की वाचा : Pune News: केतन अग्रवाल हत्याकांडावर आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; प्रकरणाला वेगळंच वळण )
कॅफेमध्ये रचला हत्येचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सिया आणि चेतन एका कॅफेमध्ये भेटले होते. तिथेच त्यांनी केतनला रस्त्यातून हटवण्याचा शेवटचा कट रचला. लोहगड किल्ल्यावर अशी कोणती जागा आहे, जिथून केतनला दरीत ढकलून अपघाताचा देखावा करता येईल, याची पूर्ण रेकी त्यांनी केली होती. केतन त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्यानेच त्यांनी त्याचा काटा काढला. सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world