मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडलं. यामध्ये अनेक वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 49 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांचा मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, "कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे."
(नक्की वाचा- CCTV Footage : कुर्ल्यात भरधाव बेस्ट बस गर्दीत शिरली, 7 जणांचा मृत्यू, 49 जण जखमी)
"या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत", असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
(नक्की वाचा- Kurla Bus Accident : कुर्ला अपघातातील 'तो' बस चालक कोण? पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर)
रोहित पवारांचा सरकारवर निशाणा
कुर्ला अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी ट्वीट करत सराकरवर निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी म्हटलं की, "कंत्राटी भरतीविरोधात आम्ही कायम आवाज उठवत आलोय, पण सत्तांध सरकारला याकडं लक्ष द्यायला वेळ नाही. अखेर मुंबईत बेस्टमधील याच कंत्राटी चालकाकडून झालेल्या अपघातात सात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. #कंत्राटी_भरती केली नसती तर अनुभव नसलेल्या चालकाला बस चालवण्यास देण्याची वेळ आली नसती आणि असा भीषण अपघात होऊन त्यात जीव गेले नसते. त्यामुळं आतातरी सरकारने कंत्राटी भरतीचा हट्ट सोडून नियमित भरती करावी आणि प्रशिक्षित असलेल्या चालकांच्याच हाती स्टेअरिंग द्यावं. या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना!"