Pune News: आता पुन्हा पुणेकरांची धडधड वाढणार, दबक्या पावलांनी 'तो' पुन्हा आला..सर्व हालचाली कॅमेरात कैद

उत्तर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.शिरूर,आंबेगाव,जुन्नर आणि खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Leopard Viral Video
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी 

Pune Leopard Viral Video : उत्तर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.शिरूर,आंबेगाव,जुन्नर आणि खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे एका शेतकऱ्याने रात्रीच्या वेळी आपल्या शेतातून दुसऱ्या शेताकडे जात असलेल्या बिबट्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत बिबट्या-मानव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.विशेषतः शिरूर तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.पिंपरखेड परिसरातील सलग घटनांनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर नुकत्याच शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे घराजवळ झोपलेल्या पाच वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने हल्ला करून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Advertisement

स्थानिक शेतकऱ्याने बिबट्याचा व्हिडीओ काढला 

ही घटना ताजी असतानाच आता आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथील बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे.स्थानिक शेतकऱ्याने रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतातून दुसऱ्या शेताकडे जाणारा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला.व्हिडिओमध्ये बिबट्या अत्यंत शांतपणे उसाच्या शेताच्या दिशेने जाताना दिसत असून, परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे स्पष्ट होत आहे.

नक्की वाचा >> Ulhasnagar News: उल्हासनगर हादरलं! आईने 20 वर्षीय मुलीला संपवलं, लव्ह अफेअरचं कनेक्शन आलं समोर

सध्या सुरू असलेला पावसाळा आणि मोठ्या प्रमाणावर वाढलेली ऊस शेती यामुळे बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित अधिवास उपलब्ध होत आहे.त्यामुळे बिबटे मानवी वस्त्यांच्या अधिक जवळ येत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.ऊस शेतीत लपून राहणे,भक्ष्याचा शोध घेणे आणि रात्रीच्या वेळी गावांच्या परिसरात वावरणे अशा घटना वाढत असल्याने ग्रामस्थांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

पिंजरे लावून तब्बल 72 बिबटे जेरबंद केले

यापूर्वी वाढत्या बिबट्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने उत्तर पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी पिंजरे लावून तब्बल 72 बिबटे जेरबंद केले होते.मात्र,पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढू लागल्याने वन विभागासमोर नवीन आव्हान उभे ठाकले आहे.परिस्थिती लक्षात घेऊन संवेदनशील भागात पाहणी वाढविणे,आवश्यकतेनुसार पिंजरे लावणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Badlapur News: बदलापुरात केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा! नगरसेविकेला झाल्या उलट्या, FDA टीम बेकरीत दाखल

वन विभागाने नागरिकांना रात्री एकटे शेतात अथवा उसाच्या शेताजवळ जाणे टाळावे,लहान मुलांवर लक्ष ठेवावे,पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि बिबट्या दिसल्यास त्याला त्रास न देता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान,मेंगडेवाडीतील बिबट्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने या भागात पाहणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.