अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune Leopard Video Viral : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा मुक्तसंचार होत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातही बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. बिबट्यांच्या हल्ल्यात काही लोकांचा मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशातच पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत खोऱ्यात बिबट्याचं दर्शन घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.कुरवटी आंबेगाव खुर्द येथे नागरीवस्ती जवळील रस्त्यावर स्थानिकांना रात्रीच्या सुमारास हा बिबट्या दिसला.त्यानंतर लोकांनी या बिबट्याचा व्हिडीओ कॅमेरात कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
बिबटे जंगल परिसर सोडून लोकवस्तीकडे येतायत
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसल्यानंतर,स्थानिकांनी त्यांच्या मोबाईल कॅमेरात बिबट्याचा व्हिडीओ काढला. परिसरात बिबट्याचा वावर सतत होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.सध्या कडक उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत.त्यामुळे बिबटे अन्न-पाण्याच्या शोधात जंगल परिसर सोडून लोकवस्तीकडे येत आहेत.विशेषतः रात्रीच्या वेळी त्यांचा संचार वाढतो.