राहुल कांबळे, नवी मुंबई
नवी मुंबई वाशी सेक्टर ३१ मधील ‘व्ही फाईव्ह लिव्हिंग लिक्विड्स' या नामांकित मद्य विक्री दुकानात झालेल्या मोठ्या चोरी प्रकरणाची वाशी पोलिसांनी यशस्वी उकल केली आहे. दुकानाचे शटर आणि लॉक तोडून चोरट्यांनी तब्बल १७ लाख ५७ हजार रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या विदेशी दारूच्या बाटल्या टेम्पोत भरून लंपास केल्या होत्या. या प्रकरणात वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांनी मिळवलेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवत मुंबईतील दहिसर परिसरातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या बऱ्याच दारूच्या बॉटल्ससह गुन्ह्यात वापरलेला टेम्पो आणि हत्यारे असा एकूण ९ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
(नक्की वाचा- Panvel Drugs : रेल्वेतून नेले जात होते 35 कोटींचे ड्रग्ज, पनवेलमध्ये 'या' पद्धतीनं झाला पर्दाफाश)
या गुन्ह्यात वापरण्यात आलेला टेम्पो चोरीसाठीच खास वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. दोन्ही आरोपी हे या प्रकारात सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता असून, त्यांच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )
वाशी पोलीस या गुन्ह्यातील आणखी आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच चोरलेली उर्वरित दारू कुठे विकली गेली याचा तपासही सुरु आहे. वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे वाशी परिसरात खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या दृष्टीने दारू दुकानांनी सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम ठेवावी आणि रात्रीच्या वेळी सुरक्षा वाढवावी अशी शिफारस पोलिसांकडून करण्यात येत आहे.