
राहुल कांबळे, प्रतिनिधी
Panvel Drugs : डोंबिवलीमधील अलीशान पलावा सोसायटीमधील ड्रग्ज अड्डा पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच उघड केला होता. या प्रकरणात काही जणांना अटक झाली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच नवी मुंबईतील पनवेलमध्ये 35 कोटींच्या ड्रग्जचा माल सापडल्यानं खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या पनवेल रेल्वे स्टेशनवर ही कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
पनवेल रेल्वे स्टेशनवर बेंगळुरुमधील नारकोटिक्स नियंत्रण विभागाने (NCB) केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 35 कोटी रुपयांचे तब्बल साडेतीन किलो 'मेथ' ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली असून, पुढील तपास रेल्वे पोलीस आणि NCB एकत्रितपणे करत आहेत.
बेंगळुरु NCBच्या गुप्त माहितीच्या आधारे, मंगला एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेवर लक्ष ठेवण्यात आले होते. संबंधित महिला पनवेल स्थानकावर पोहोचताच, NCB आणि पनवेल रेल्वे पोलीस यांच्या पथकाने तिला अटक केली. तिच्याकडून 'मेथाम्फेटामाइन' हा अत्यंत घातक आणि व्यसनाधीन बनवणारा पदार्थ सापडला. हे ड्रग्ज साडेतीन किलो वजनाचे असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 35 कोटी रुपये असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
( नक्की वाचा : Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )
ही कारवाई विशेषतः रेल्वे मार्गांचा गैरवापर करून ड्रग्ज वाहतूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध एक मोठा झटका मानला जात आहे.
NCB व रेल्वे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या नायजेरियन महिलेमार्फत कोणत्या टोळीशी संपर्क आहे, ही ड्रग्ज कुठून आणली गेली आणि कुठे पोहोचवायची होती, याचा शोध घेतला जात आहे.
सध्या जप्त करण्यात आलेले ड्रग्ज रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) ताब्यात देण्यात आले आहे. तसेच आरोपी महिलेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
"बेंगळुरु NCBच्या माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई यशस्वी झाली. ड्रग्स तस्करीसाठी रेल्वेचा वापर होत असल्याचे समोर येत असून, अशा प्रकारच्या कारवायांसाठी रेल्वे पोलीस आणि NCB मिळून कठोर पावले उचलत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिक आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे,'' अशी माहिती रेल्वे पोलीस उपायुक्त प्रज्ञा शेडगे यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world