सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवडगाव येथील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध श्री मोरया गोसावी मंदिर संकष्टी चतुर्थी यात्रेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात्रेत कथितपणे 'मेड इन पाकिस्तान' (Made in Pakistan) लिहिलेल्या वस्तूंची, प्रामुख्याने चादरींची विक्री होत असल्याचा दावा एका स्थानिक महिलेने केला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत असून, यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमका काय आहे व्हिडिओमधील दावा?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील महिलेच्या दाव्यानुसार, तिने चिंचवडगाव येथील संकष्टी चतुर्थी यात्रेतील एका स्टॉलवरून वापरण्यासाठी चादर खरेदी केली होती. घरी आणल्यानंतर जेव्हा तिने ती चादर धुण्यास काढली, तेव्हा तिला चादरीच्या एका कोपऱ्यात कापडाच्या आत लपवलेले 'Made in Pakistan' चे लेबल आढळले. हे लेबल पाहून महिलेला मोठा धक्का बसला. तिने तात्काळ याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला.
"देशात पाकिस्तानी वस्तूंवर कडक निर्बंध असताना आणि दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असताना, आपल्या स्थानिक धार्मिक यात्रेत अशा वस्तू सर्रास कशा विकल्या जातात?" असा संतप्त सवाल या महिलेने उपस्थित केला आहे.
(नक्की वाचा- मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा)
नागरिकांमधून प्रशासनाला सवाल; चौकशीची मागणी
या व्हिडिओमुळे पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांमधून स्थानिक प्रशासनावर आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या यात्रेत रस्त्यावरील स्टॉल्स लावणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि त्यांच्या मालाची कोणतीही तपासणी केली जात नाही का, अशी विचारणा केली जात आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे.
दुसरीकडे, काही सुजाण नागरिकांनी आणि तज्ज्ञांनी या प्रकरणात सावध भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे लेबल खरे आहे की केवळ अफवा पसरवण्यासाठी ते जाणीवपूर्वक लावले गेले आहे, याची कायदेशीर पडताळणी आधी होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
(नक्की वाचा- रोहित-विराटसोबत खेळलेल्या खेळाडूची 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावुक पोस्ट लिहत म्हटलं..)
अधिकृत तक्रार नाही, फॅक्ट चेकचे आव्हान
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या संदर्भात अद्याप स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा प्रशासनाकडे कोणतीही अधिकृत लेखी तक्रार दाखल झालेली नाही. संबंधित चादर अधिकृत मार्गाने आयात केली गेली होती, की बेकायदेशीररित्या बाजारात आणली गेली, याचा शोध घेणे अद्याप बाकी आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आणि महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सत्यता समोर आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.