भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) संघातून खेळलेला यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरत (KS Bharat) याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अचानक रामराम ठोकला आहे. आंध्र प्रदेशच्या या 32 वर्षीय क्रिकेटपटूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. भारतासाठी खेळणे हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता, अशा भावना त्याने यावेळी व्यक्त केल्या.
'माझ्या देशासाठी खेळणे हा सर्वात मोठा बहुमान'
केएस भरतने आपल्या पोस्टच्या पहिल्याच स्लाईडवर "Thank you BCCI" लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याने लिहिले, "अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझ्या निवृत्तीची घोषणा करत आहे. माझ्या देशासाठी खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च बहुमान होता. भारतासाठी कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व करण्याचा मान या प्रत्येक क्षणासाठी मोलाचा होता."
त्याने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबाला देत म्हटले की, गेल्या दोन दशकांपासून एका 4 जणांच्या कुटुंबाने एकच स्वप्न पाहिले आणि ते जगले. माझी बहीण, आई आणि वडिलांनी मला जे वातावरण आणि पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
केएस भरतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
- एकूण कसोटी सामने- 7 सामने
- एकूण धावा- 221 धावा
- फलंदाजी सरासरी - 20.09
- सर्वोच्च धावसंख्या- 44 धावा
- यष्टिरक्षण - 21 कॅच आणि 1 स्टम्पिंग
(नक्की वाचा- मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा)
विराट, रोहित आणि राहुल द्रविड यांचे मानले आभार
केएस भरतने आपल्या प्रवासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांचे विशेष आभार मानले आहेत.
- विराट कोहली: 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून आयपीएल पदार्पण करण्याची संधी देणाऱ्या विराट कोहलीचे त्याने आभार मानले, ज्यामुळे त्याला खरी ओळख मिळाली.
- रोहित शर्मा: ज्याच्या नेतृत्वाखाली त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्या कर्णधार रोहित शर्माचे आभार मानताना त्याने हा क्षण शब्दांच्या पलीकडचा असल्याचे म्हटले.
- राहुल द्रविड: 'इंडिया ए' संघापासून ते मुख्य भारतीय संघापर्यंत सातत्याने मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षक राहुल द्रविड सरांचे मार्गदर्शन कधीही विसरता येणार नाही, असे भरत म्हणाला.
याशिवाय त्याने आपले बालपणीचे प्रशिक्षक जे. कृष्णा राव, आंध्र क्रिकेट असोसिएशन, विशाखापट्टणम जिल्हा क्रिकेट असोसिएशन (VDCA), सर्व मैदानांचे ग्राउंड स्टाफ आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले.
तरुणांना सल्ला आणि भविष्यातील योजना
निवृत्ती जाहीर करताना त्याने तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यासाठी कठोर परिश्रम व शिस्त बाळगण्याचा सल्ला दिला. जरी त्याचा बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील प्रवास संपला असला, तरी तो क्रिकेटशी जोडलेला राहणार आहे. आगामी काळात तो खेळत राहील आणि मार्गदर्शक तसेच प्रशिक्षक म्हणून पुढील पिढीला मार्गदर्शन करत राहील, असे त्याने स्पष्ट केले.