महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. राज्याची सत्ता महायुतीकडे राहणार की महाविकास आघाडी बाजी मारणार हे आज कळणार आहे. निवडणुकीचे निकाल लागण्याआधी अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. ज्यामध्ये राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असं बहुतांश सर्व्हेतून दिसून येत आहे. मात्र महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनीही आकडे देत राज्यात आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी महाविकास आघाडीला 157 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीला 160 जागा मिळण्याचा अंदाज दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील महाविकास आघाडीला 150 ते 155 जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत आघाडीला 158 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
(नक्की वाचा: निकालाआधीच विजय फिक्स; 'या' 10 दिग्गजांचे बॅनर्सही झळकले!)
सी व्होटरच्या सर्व्हेत काय म्हटलं?
सी-वोटरने प्रकाशित केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीच्या पाड्यात 112 जागा टाकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 104 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली आहे. तर 11 जागी अन्य निवडून येतील असं पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जवळपास 61 जागांवर कांटे की टक्कर असल्याचे यात सांगण्यात आले आहे. या जागांवर काय निकाल लागतो यावर सरकार कोण स्थापन करणार हे स्पष्ट होणार आहे. या 61 जागांवर अगदीच चुरशीची लढत होत आहे. विधानसभेच्या 288 जागांवर 20 नोव्हेंबरला मतदान झाले. त्याच दिवशी सी- वोटरने हा सर्व्हे केला आहे.
IANS-मॅट्रिज ओपनियन पोलमध्ये महायुतीला 145-165 जागा मिळण्याचा अंदाज
IANS-मॅट्रिज ओपनियन पोलनुसार राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला 145-165 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
(नक्की वाचा- अपक्ष अन् बंडखोरासाठी तगडी फिल्डिंग! भाजपने डाव टाकला; 'या' 8 नेत्यांकडे मोठी जबाबदारी)
लोक पोल सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला किती जागा?
लोक पोल सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडी (MVA) म्हणजेच काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांना 151-162 जागा मिळण्याची शक्यता आहे.
मॅट्रिज पोलनुसार महायुतीला बहुमत
मॅट्रिजच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 150 ते 170 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळतील असा अंदाज आहे. राज्यात 288 विधानसभेच्या जागा आहेत. बहुमत मिळवण्यासाठी 145 जागा मिळणे आवश्यक आहे.
'चाणक्य' चा एक्झिट पोल काय सांगतो?
'चाणक्य स्ट्रॅटेजीस'च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 152-160 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महाविकास आघाडीला 130-138 जागा मिळतील असं या पोलमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
'इलेक्टोरल एज' नुसार मविआला बहुमत
'इलेक्टोरल एज' च्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतं. या पोलमध्ये मविआला 150 जागा देण्यात आल्या आहेत. तर महायुतीची वाटचाल 118 पर्यंत मर्यादीत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.