Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र राज्याचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांच्या दळणवळण व्यवस्थेत क्रांती घडवून आणणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने रस्ते, मेट्रो आणि रेल्वे अशा पायाभूत सुविधांवर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून शहरांचा चेहरामोहरा बदलणार आहे.
मेट्रो प्रकल्पांना मोठा बुस्टर
राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली आहेत. 2029 पर्यंत 165 किमी लांबीच्या नवीन मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये 173 किमीच्या मेट्रो मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या असून, आगामी वर्षात आणखी 50 किमीच्या मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
यामध्ये वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या 23,487 कोटी रुपये खर्चाच्या पूर्णतः भूमिगत मार्गिकेचा समावेश असून, तिचा विस्तार वांद्रे स्टेशनपर्यंत केला जाणार आहे. तसेच मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो 8 या 22,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे कामही हाती घेतले जाणार आहे.
( नक्की वाचा : Vande Bharat: मुंबई गाठणं झालं आणखी सोपं! नांदेड-मुंबई वंदे भारतच्या वेळेत मोठे बदल, वाचा नवं वेळापत्रक )
मुंबई-ठाणे प्रवासासाठी भुयारी मार्ग आणि उन्नत रस्ते
मुंबई आणि ठाणे या शहरांमधील प्रवास वेगवान करण्यासाठी ठाणे ते बोरिवली दरम्यानच्या भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू असून ते जून 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय गायमुख ते फाऊंटन जंक्शन असा 6 किमी लांबीचा नवीन भुयारी मार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे.
ऐरोली ते काटई नाका या उन्नत मार्गाचे कामही आता वेगाने पुढे सरकणार आहे. छेडानगर ते आनंदनगर आणि तिथून साकेतपर्यंतच्या उन्नत मार्गाचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. साकेत ते आमणे या उन्नत मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामही सध्या सुरू आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोची नवी गुगली! आता स्टेशनमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बदलावी लागणार सवय )
सागरी सेतू आणि नवीन कनेक्टिव्हिटी
सागरी मार्गांच्या बाबतीतही सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून वसई ते विरार आणि उत्तन ते विरार या सागरी सेतूंची कामेही आता हाती घेतली जाणार आहेत.
अटल सेतू ते मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला जोडणारा उन्नत मार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून यासाठी 1,102 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी उलवे खाडीपुलाचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे. वर्सोवा-दहीसर-भाईंदर या किनारी मार्गाचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.
रेल्वे कॉरिडॉर आणि विमानतळ विकास
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे ते लोणावळा दरम्यानच्या मार्गिकेसाठी 5,100 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईच्या उपनगरीय भागात बदलापूर-कर्जत, आसनगाव-कसारा आणि पनवेल-वसई दरम्यान 69 किमी लांबीचे नवीन रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत.
विमानतळांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, पुण्यातील पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच शिर्डी, नाशिक, संभाजीनगर आणि कराड येथील विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामेही वेगाने पूर्ण केली जाणार आहेत.
ग्रामीण भागाचा विकास आणि नवीन हायवे
राज्यातील ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यासाठी 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे काँक्रिटच्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. आशियाई विकास बँकेच्या मदतीने यासाठी 4,500 कोटी रुपयांचा मोठा कार्यक्रम राबवण्यात येईल.
रस्ते विकासामध्ये पुणे ते संभाजीनगर या 192 किमी लांबीच्या ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार होत असून, कल्याण ते लातूर असा नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे देखील प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे राज्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणारी वाहतूक अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world