शिंदेंच्या ठाण्यात मराठीला तिसऱ्या भाषेचा दर्जा, प्रसिद्ध इंग्रजी शाळेची मुजोरी ; मनसेचा निर्वाणीचा इशारा

Thane School Language Row या शाळांमध्ये हिंदी ही दुसरी भाषा म्हणतात आणि मराठी तिसरी भाषा म्हणतात, हे चालणार नाही.  आम्ही शाळेला ताकीद दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी मला शब्द दिलाय की ते लगेच मराठी ही अनिवार्य असेल असा मेसेज ते प्रसारीत करणार आहेत. असे मनसेच्या अविनाश जाधव यांनी म्हटले.

जाहिरात
Read Time: 2 mins
ठाणे:

शिवसेनेचा मजबूत किल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील एका शाळेने हिंदी भाषा अनिवार्य आहे म्हणून जाहीर केले. काही दिवसांपूर्वी हिंदी भाषा ही शाळांमध्ये पहिलीपासून अनिवार्य केली जाईल असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. मात्र याला कडाडून विरोध झाल्यानंतर  हिंदी भाषा ही 'अनिवार्य' असणार नाही असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते. असं असूनही ठाण्यातील युरो स्कूलने हिंदी ही अनिवार्य भाषा असून मराठी भाषा ही तिसरी भाषा असेल असे पालकांना कळवण्यास सुरुवात केली होती. शिवसेना पक्ष हा मराठीचा कडवट पुरस्कार करणारा पक्ष म्हणून  ओळखला जातो. या पक्षाचे प्रमुख असलेल्या शिंदेंच्या ठाण्यातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष बाब म्हणजे की राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे हे देखील शिवसेनेचेच आहेत. 

नक्की वाचा : काम न करणारे विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष तत्काळ बदलणार

शाळेतील बहुतांश मुले मराठी

मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे काही पालकांनी मराठी भाषा ही तिसरी भाषा केल्याचे सांगितले होते. या शाळेत शिकणारी बहुतांश मुले ही मराठी असून इथे भाषा तिसरा पर्याय म्हणून का दिला जात आहे असा सवाल जाधव यांनी विचारला आहे. शाळेमध्ये हिंदी हा तिसरा पर्याय असायला हवा असे जाधव यांचे म्हणणे आहे. जाधव यांनी सोमवारी या शाळेला भेट देत  मुख्याध्यापकांना जाब विचारला. जाधव यांनी म्हटले की, "दोस्ती परिसरातील युरो स्कूलने कालपासून पालकांना फोन करण्यास सुरुवात केली आहे. शाळेने सांगायला सुरुवात केलीय की मराठी ही यापुढे दुसरी नाही तर तिसरी भाषा असेल. मराठी कशी काय थर्ड लँग्वेज असू शकते ?"

नक्की वाचा : अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ

तर, शाळा चालू देणार नाही!

जाधव यांनी पुढे म्हटले की, या शाळांमध्ये हिंदी ही दुसरी भाषा म्हणतात आणि मराठी तिसरी भाषा म्हणतात, हे चालणार नाही.  आम्ही शाळेला ताकीद दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी मला शब्द दिलाय की ते लगेच मराठी ही अनिवार्य असेल असा मेसेज ते प्रसारीत करणार आहेत. तसे झाले नाही तर ही शाळा चालू देणार नाही. 

मुजोरी केल्यास शाळेची मान्यता रद्द करू

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांना सदर प्रकाराबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की,  "राज्यात कुठेही मराठी भाषेला दुय्यम दर्जा देत असेल अशा शाळेवर कारवाई करण्यात येईल कोणत्याही शाळेने भूमिका घेतली असेल तर शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल. गरज पडल्यास आमचे शिवसैनिक पाठवून आमच्या पद्धतीने धडा शिकवू"

Advertisement
Topics mentioned in this article