महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे कौल हळूहळू समोर येत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे. तर महाविकास आघाडीला तगडा झटका बसताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती 218 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी 58 जागांवार अडकली आहे. मात्र हा जनतेचा कौल नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
निकालात काहीतरी गडबड आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कोणत्या भरवशावर मिळत आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी असे काय दिवे लावले की भाजपला 120 च्या पुढे जागा मिळत आहेत. महाराष्ट्रातलं वातावरण आणि कल ज्या पद्धतीने होता आम्ही राज्यभर भिरलो. हा कौल कसा मानावा हा जनतेलाही प्रश्न पडला असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
जनतेचा कौल नाही- संजय राऊत
शरद पवार यांनी राज्यात तुफान उभं केलं होतं. तुम्ही त्यांना 10 जागाही द्यायला तयार नाही. यात काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल. हा जनतेचा कौल आहे हे आम्ही मानणार नाही. निवडणुकीतीत जय पराजय होत असतात. मात्र जे निकाल लावून घेतले आहेत, त्यावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्यांचा विश्वास बसणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
निकालात मोठी गडबड- संजय राऊत
आजच्या निकालात मोठी गडबड आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या गद्दारीबाबत राज्यभरात रोष आहे. तरीही त्यांचे सर्व आमदार कसे निवडून येतात. या निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसत आहे. हा निकाल 100 टक्के लावून घेतलेला निकाल आहे, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला.